तिसऱ्या बूस्टर डोसची चर्चा करताय? पण महाराष्ट्रात असेही काही जण जे अजूनही पहिली लस घेण्याबाबतही अनुत्सुक

नंदूरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगररांगात, नर्मदेच्या काठावर राहणारे आदिवासी अजूनही पहिली लस घेण्यासही उत्सुक नाहीत. कोरोना या आजाराची त्यांना असलेली माहिती ही केवळ ऐकीव स्वरुपाची आहे. त्या ठिकाणी सरकारी आरोग्य कर्मचारी पोहचत नाहीत, पोहचले तरी त्यांना मिळणारा प्रतिसाद हा फारच थंड स्वरुपाचा आहे. 

    नंदूरबार : ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेनंतर सगळीकडे आता कोरोना प्रतिंबधाच्या तिसऱ्या लसीची म्हणजेच बूस्टर डोसची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आपल्या राज्यातच नंदूरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगररांगात, नर्मदेच्या काठावर राहणारे आदिवासी अजूनही पहिली लस घेण्यासही उत्सुक नाहीत. कोरोना या आजाराची त्यांना असलेली माहिती ही केवळ ऐकीव स्वरुपाची आहे. त्या ठिकाणी सरकारी आरोग्य कर्मचारी पोहचत नाहीत, पोहचले तरी त्यांना मिळणारा प्रतिसाद हा फारच थंड स्वरुपाचा आहे.

    आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्या सहाय्याने या भागात आदिवासींचे लसीकरण करण्याचे प्रयत्न काही वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स करीत आहेत. मात्र त्यांना अद्यापही म्हणावे तसे यश आलेले नाही. लस घेण्यापासूनच हे सर्व आदिवासी बांधव घाबरत आहेत. त्यांना समजावून सांगण्याइतपत संवाद दुर्दैवाने अद्यापही या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांना जमू शकलेला नाही. तरीही काही जण , ज्यांनी यासाठी गेले काही वर्षे सातत्याने प्रयत्न केले आहेत, तेच फक्त या आदिवासींना समजावून सांगण्यात यशस्वी होतायेत. आणि दिवसाकाठी ४५, ५० लसीकरण तेही पहिल्या टप्प्यातलं करण्यात त्यांना यश मिळते आहे.

    सातपुडा डोंगरदऱ्यात असलेल्या नम्रदेच्या काठावर अनेक आदिवासी पाडे हे विखुरलेल्या स्थितीत आहेत. त्या ठिकाणी पोहचायचं म्हणजे एक दिव्यच म्हणावं लागेल. काही तास बोटींचा प्रवास केल्यानंतर, डोंगर दऱ्यात उतरुन काही तासांचा प्रवास करुन यातील काही पाड्यांवर पोहचता येते. मात्र तिथेही एका पाड्यावर राहणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटांवर मोजण्यासारखी आहे. तिथून परुन्हा दुसऱ्या पाड्यावर जाण्यासाठी पायपीट ठरलेलेलीच. त्यातही हे आदिवासी त्यांच्या आर्थार्जनासाठी घरातून बाहेर गेलेले असतात, कधी जंगलात, कधी जवळच्या गावी गेलेले असतात. काही जण सरपण आणम्यासाठी , काही जण मासेमारीसाठी गेलेले असतात. अशा वेळेत त्यांना मोबाईल करुन बोलवावे तर तीही सोय या भागात नाही. कारण अनेकांकडे आर्थिक स्थितीमुळे मोबाईल फोनही उपलब्ध नाहीयेत.

    अशा स्थितीत या भागातील आदिवासींना एकत्र करणे, त्यांना लसीचे महत्त्व पटवून देणे आणि अखेरीस त्यांना लस घेण्यासाठी राजी करुन , लस टोचणे हे मोठे आव्हान या परिसरात फिरणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोमर आहे.

    त्यामुळे या भागातील लसीकरणासाठी दोन दोन, तीन तीन दिवस त्या भागात फिरावे लागते. तिथून परतीचा मार्ग नसल्याने अनेकदा तिथेच मुक्कामीही राहावे लागत आहे. मात्र अशाही स्थितीत या आदिवासींचं लसीकरण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, हेच विशेष.