‘नमो महारोजगार’साठी शरद पवारांच्या उपस्थितीची चर्चा; उपस्थितांकडून टाळ्या अन् शिट्ट्यांसह जल्लोष

नमो महारोजगार मेळाव्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निमंत्रण पत्रिकेमध्ये ऐनवेळी नाव टाकण्यात आल्याने माध्यमांसह सर्वांचेच लक्ष या मेळाव्याकडे लागले होते. अखेर शरद पवार यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

  बारामती : नमो महारोजगार मेळाव्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निमंत्रण पत्रिकेमध्ये ऐनवेळी नाव टाकण्यात आल्याने माध्यमांसह सर्वांचेच लक्ष या मेळाव्याकडे लागले होते. अखेर शरद पवार यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावर थांबून पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांचे स्वागत केले.

  शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर नमो महाराज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सुरुवातीला शरद पवार यांचे नाव नसल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. या मेळाव्याच्या दोन दिवस अगोदर स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पत्राद्वारे गोविंद बाग या आपल्या निवासस्थानी स्नेह भोजनाचे निमंत्रण दिले होते. विद्या प्रतिष्ठान या संस्थेचा अध्यक्ष व संसद सदस्य या नात्याने आपणास नमो महा रोजगार मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांचे स्वागत करण्यास आपणास आवडेल, असे या पत्रामध्ये शरद पवार यांनी म्हटले होते.

  पवार यांच्या या पत्रामागे राजकीय खेळी आहे की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात होता. या कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली होती यामध्ये नव्याने शरद पवार यांचे नाव प्रमुख उपस्थिती मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमास शरद पवार उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  मात्र या कार्यक्रमापूर्वीच सकाळी लवकर शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवर दाखल होण्याच्या अगोदर स्वतः शरद पवार कार्यक्रम स्थळाच्या प्रवेशद्वारावर थांबले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी हस्तांदोलन करून स्वागत केले.

  व्यासपीठावर फडणवीस शेजारीच

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्ची शेजारीच शरद पवार यांची खुर्ची ठेवण्यात आली होती. दोघे शेजारी बसल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. शरद पवार यांनी आपल्या भाषणात विद्या प्रतिष्ठान या संस्थेचा आढावा सादर करत विद्या प्रतिष्ठान मध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रशिक्षण कोर्स सुरू करणार असल्याचे सांगत या क्षेत्रामध्ये राज्य सरकारचे देखील सहकार्य मिळत असल्याचे आवर्जून सांगितले.

  प्रेक्षकांचा शिट्ट्यांसह जल्लोष

  बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्याप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आगमन झाल्यानंतर, तसेच त्यांचा सत्कार करताना व ते भाषणात उभे राहिल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या वाजवत जल्लोष करण्यात आला.

  शरद पवार यांच्या नमो महारोजगार मेळाव्याच्या उपस्थितीमुळे अनेकांना धक्का बसला होता. या मेळाव्याच्या ठिकाणी व्यासपीठावर शरद पवार यांचे आगमन होताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जल्लोष केला. पवार यांनी देखील उपस्थित प्रेक्षकांना हात उंचावून प्रतिसाद दिला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे आगमन झाल्यानंतर देखील प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या प्रेक्षकांमध्ये विशेषतः तरुण वर्ग व बारामतीकरांनी जल्लोष केला.