अस्सल कोळी पद्धतीची ‘भरलेले पापलेट’ रेसिपी नक्कीच ट्राय करा

    साहित्य :

    • एक मोठे ताजे पापलेट
    • ४ चमचे चिंचेचा कोळ
    • ½ कप भाजलेलं सुके खोबरे
    • ½ कप ओल्या नारळाचा खीस
    • दोन प्रकारच्या वाटणासाठी ५/६ हिरव्या मिरच्या
    • १ आले
    • ७/८ लसूण पाकळ्या
    • मूठभर कोथिंबीर
    • २ चमचे हळद
    • २ चमचे घरगुती लाल मसाला
    • १ चमचा घरगुती गरम मसाला
    • ½ बारीक किंवा जाड रवा
    • ½ कप तांदळाचे पीठ
    • तळण्याकरिता तेल
    • चवीनुसार मीठ

    कृती :

    प्रथम पापलेट स्वच्छ धुवून घ्यावा आणि त्याच्या पोटाकडील भागात खण तयार करून घ्या. आता मिक्सर मध्ये ५/६ हिरव्या मिरच्या, १” आले, ७/८ लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर इत्यादी बारीक वाटून घ्यावे. तयार हिरवं वाटण पापलेट वर घालावे. सोबत चवीनुसार मीठ, १½ चमचे घरगुती लाल मसाला, १ चमचे हळद, २ चमचे चिंचेचा कोळ इत्यादी साहित्य घालून पापलेटला चांगले चोळून घ्यावे. पापलेटला मसाला लावून झाल्यावर त्याला १० मिनिटे मुरवत ठेवा. आता सारणासाठी वाटण तयार करायचे.

    मिक्सर मध्ये ५/६ हिरव्या मिरच्या, १” आले, ७/८ लसूण पाकळ्या, भाजलेले सुके खोबरे, ओले खोबरे आणि मूठभर कोथिंबीर इत्यादी बारीक वाटून घ्यावे. वाटण वाटण्यास गर्जे इतकाच पाणी घालावे. वाटण पात्तळ होणार नाही याची काळजी घ्यावी. आता पॅनमध्ये ४ चमचे तेल घालून चांगले तापवून घ्या. तेल तापल्यावर तयार सारणाचे वाटण घालून परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात १ चमचा हळद, ½ चमचा घरगुती लाल मसाला, २ चमचा चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य घालून ५ मिनिटे मध्यम आचेवर वाटण कोरडे होईपर्यंत फ्राय करून घ्या. सारण तयार झाल्यावर त्याला थंड होऊ द्या.

    सारण थंड झाल्यावर त्याला पापलेटच्या पोटात म्हणजेच खण तयार करून घेतलेल्या पोटाकडील भागात भरून घ्या. अगदीच जास्त गच्च भरून घ्यायचे नाही. आता रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्याचे पापलेटवर एक छान कोटिंग तयार करून घ्या. आता पापलेटला गरम तेलात ५ मिनिटे एका बाजूने तर ५ मिनिटे दुसऱ्या बाजूने असे मध्यम आचेवर फ्राय करून घ्या. भरलेल्या पापलेटचा आस्वाद भाकरी सोबत तुम्ही घेऊ शकता.