निवडणुकीत रिस्क नको! घोडेबाजार टाळण्यासाठी नागपूरचे भाजप नगरसेवक गोवा टूरवर

काँग्रेस आमच्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, आमच्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून खबरदारी म्हणून भाजपचे नगरसेवक एकत्रित राहण्यासाठी जात असल्याची प्रतिक्रिया भाजपचे महापालिकेचे नेते अविनाश ठाकरे यांनी दिली आहे.

    नागपूर (Nagpur) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत. (Chhotu Bhoyar vs Chandrashekhar Bawankule) उमेदवारी जाहीर केली आहे.

    भाजप नगरसेवकांचा एक मोठा समूह गोव्यासाठी रवाना
    विधानपरिषदेची नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. नागपूर महापालिकेतील भाजप नगरसेवकांचा एक मोठा समूह गोव्यासाठी रवाना झाला आहे. काल रात्री उशिरा नागपूर विमानतळावरून भाजप नगरसेवक गोवासाठी रवाना झाले. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, दगा फटका होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून भाजपने नगरसेवकांना छोट्या छोट्या समूहात विविध ठिकाणी ठेवण्याचे ठरविले असून त्याअंतर्गत पहिला समूह गोव्याला रवाना झाला आहे.

    काँग्रेस आमच्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, आमच्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून खबरदारी म्हणून भाजपचे नगरसेवक एकत्रित राहण्यासाठी जात असल्याची प्रतिक्रिया भाजपचे महापालिकेचे नेते अविनाश ठाकरे यांनी दिली आहे.

    विशेष म्हणजे विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे छोटू भोयर यांच्यात लढत होत असून काँग्रेसने भाजप नगरसेवक छोटू भोयर यांना उमेदवारी देऊन आधीच भाजपला झटका दिला आहे. पुढे निवडणुकीत छोटू भोयर किंवा काँग्रेसकडून आपले नगरसेवक फोडले जाऊ नये ही भीती भाजपला आहे. त्यामुळेच भाजप नगरसेवकांना विविध ठिकाणी पाठवले जात आहे.