एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं; भाजपच्या ‘या’ नेत्याची खुली ऑफर

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे सर्वात ताकदवान नेते असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर दिली आहे.

    ठाणे : भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सध्या जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे. भाजप नेते अनेकदा शिवसेनेवर घराणेशाहीची टीका करत असतात. आता तर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे सर्वात ताकदवान नेते असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर दिली आहे.

    राज्याचे दिग्गज नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना ओळखण्यात येतं. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होण्याअगोदर शिवसेनेच्या सत्तेची सर्व सुत्र एकनाथ शिंदे यांच्याकडं होती. परिणामी राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा प्रमुख चेहरा अशी एकनाथ शिंदे यांची ओळख बनली होती. पण अचानक 2019 ला राज्यात मोठी राजकीय घडामोड झाली आणि एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील पर्यायानं सरकारमधील वजन कमी झाल्याच्या चर्चा होवू लागल्या. भाजपकडून अनेकदा एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली. आताही भाजप आमदार नितेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं, असं वक्तव्य केलं आहे.

    नितेश राणे यांच्या या वक्तव्यानं भाजपसाठी एकनाथ शिंदे किती महत्त्वाचे आहेत. हे परत एकदा अधोरेखीत झालं आहे. एकनाथ शिंदे हे दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे राजकीय वारसदार आहेत. परिणामी त्यांच्याकडून पक्षांतर कधीच होणार नाही, असंं अनेकदा खुद्द एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे.