महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेसची हकालपट्टी करा; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणारा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असणाऱ्या काँग्रेसची राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षाची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी केली.

  इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणारा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असणाऱ्या काँग्रेसची राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षाची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी केली.
  ते म्हणाले, जर महाविकास आघाडीमधून काँग्रेसची हाकलपट्टी करायची नसेल तर शिवाजी महाराजांच्या बद्दलचे प्रेम हे बेगडी आहे. हे जनतेसमोर येईल. या प्रकरणाने तुम्हाला काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसता येणार नाही. महाडिक शैक्षणिक संकुलात भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा बैठकीसाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ते बोलत होते. यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, सचिव जयराज पाटील, प्रविण फोंडे, सुजित थोरात उपस्थित होते.
  पाटील म्हणाले, सरकार स्वतःच्या तुंबड्या भरण्याचा काम करीत आहे. त्यांना विविध प्रश्नांचे गांभीर्य नाही. एमपीएससीच्या परीक्षा, आरोग्य सेवा आणि म्हाडाच्या परीक्षा शिक्षक भरतीच्या परीक्षांमधील गैरव्यवहार झाला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत अयशस्वी ऊर्जामंत्री आहेत. मुलाच्या निवडणुकीसाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरले. हा गंभीर प्रकार आहे. कोरोनाच्या काळात वीजदर वाढवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. पदाचा गैरवापर केल्याबद्दल राऊत यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी राज्यपालांना भेटून मागणी केली आहे.
  दुग्धाभिषेक घालणे राष्ट्रवादीची नौटंकी 
  विक्रांत पाटील म्हणाले, “महाआघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आरोपी आहे आणि दुसरीकडे सरकारमधील राष्ट्रवादी पक्ष छत्रपतींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून राज्यभर नौटंकी करत आहेत.
  पेपरफुटीचे कनेक्शन मंत्रालयात..!
  राज्यातील पेपरफुटीचे थेट कनेक्शन मंत्रालयापर्यंत आहे, असा आरोप विक्रांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, या रॅकेटचा गॉडफादर वेगळाच आहे. याचा शोध हे सरकार घेणार नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांच्याकडे केली आहे.
  …तर तुमची शिवसेना नव्हे सोनिया सेना
  शिवसेना राज्यात काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आणि त्यांनी केलेली विटंबना सहन करणार या दोन्ही भूमिका महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तुम्हाला सत्ता प्रिय असेल तर तुमची शिवसेना संपली व सोनिया सेना निर्माण झाली याच्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी जहरी टीका विक्रांत पाटील यांनी केली.