‘फेसबुक फ्रेंड’चा विवाहितेवर अत्याचार; जबरीने करून घेतला गर्भपात

दोघांनीही शताब्दी चौकात भाड्याने खोली घेतली आणि पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. 2019 मध्ये पीडित महिला ही जरीपटका हद्दीत कुशीनगर येथे राहायला गेली. तेथेही त्यांच्यात शारीरिक संबंध होत होते. या दरम्यान महिलेला गर्भधारणा झाली.

  नागपूर,  विवाहितेची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली. त्यांच्यात चॅटिंग होऊ लागली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेयसीला भेटायला तरुण नागपूरला आला. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान ती गर्भवती झाली असता गर्भपात करून घेतला आणि नंतर लग्न करण्यास नकार देत दुरावा केला. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

  देवेंद्र विकास पवार (38) रा. चांदसार, जळगाव असे आरोपीचे नाव आहे.
  पीडित 36 वर्षीय महिला ही विवाहित असून जरीपटका भागात राहते. महिलेचे 18 व्या वर्षी लग्न झाले होते. तिचा पती खाजगी वाहनचालक आहे. तिला एक मुलगा व मुलगी आहे. पतीसोबत पटत नसल्याने ती मुलांना घेऊन वेगळी राहते. ती एका खाजगी दवाखान्यात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. सप्टेंबर 2017 मध्ये जळगाव येथे राहणाऱ्या देवेंद्रशी तिची फेसबुकवर मैत्री झाली. त्यांच्यात दररोज चॅटिंग होऊ लागली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

  त्यानंतर देवेंद्रने तिला भेटण्यासाठी जळगावला बोलावले. ती जळगावला गेली. मित्राच्या घरी घेऊन जात देवेंद्रने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. ती तशीही पतीपासून वेगळी रहात होती. यामुळे ती देवेंद्रसोबत लग्नाचे स्वप्न पाहू लागली. काही दिवसांनी देवेंद्रही नागपूरला आला. त्यानंतर दोघांनीही शताब्दी चौकात भाड्याने खोली घेतली आणि पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. 2019 मध्ये पीडित महिला ही जरीपटका हद्दीत कुशीनगर येथे राहायला गेली. तेथेही त्यांच्यात शारीरिक संबंध होत होते. या दरम्यान महिलेला गर्भधारणा झाली. तिने याबाबत देवेंद्रला सांगितले असता त्याने गर्भपात करण्यास सांगितले.

  पीडितेने गर्भपात करण्यास नकार दिला. त्याने तिला पुन्हा लग्नाचे दिवास्वप्न दाखविले आणि गर्भपात करून घेण्यासाठी तयार केले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने गर्भपात केला. मात्र गर्भपात होताच देवेंद्रने पीडितेपासून दुरावा केला. तिने कारण विचारले असता त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. प्रेमात दगा मिळाल्यामुळे पीडितेने पोलिस स्टेशन गाठून देवेंद्र विरुद्ध तक्रार दाखल केली. जरीपटका पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.