प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा यांचे मुंबईत निधन

प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा यांचे आज मुंबईत निधन झाले. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय हे अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते.

    मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा (Subrata Roy passed away) यांचे आज मुंबईत निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय हे अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उद्या त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाणार असून तिथेच त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.(Famous industrialist Subrata Roy Sahara passed away in Mumbai)

    सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे उद्योगपती आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते.

    फसवणूक व भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भोगावा लागलेला तुरुंगवास 

    अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लोकांनी हे पैसे कंपनीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवले होते. मात्र नंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सुब्रत रॉय यांना मोठा  दिलासा मिळाला. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशावर तात्काळ सुनावणी करून स्थगिती दिली होती. तसेच, त्यांच्यावर पुढील कारवाईबाबत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सुब्रत रॉय यांच्यावर असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याप्रकरणात ते जामिनावर बाहेर होते.