
अकोल्यात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क गांजाची लागवड केली. पण आता हा कारनामा त्याला चांगलाच महागात पडला आहे. सद्यस्थित या शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तब्बल ६५ किलो गांजा तसेच जवळपास २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अकोला : अकोल्यात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क गांजाची लागवड केली. पण आता हा कारनामा त्याला चांगलाच महागात पडला आहे. सद्यस्थित या शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तब्बल ६५ किलो गांजा तसेच जवळपास २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजाची लागवड करून मोठा आर्थिक फायदा व्हावा यासाठी या शेतकऱ्याने वेगळीच शक्कल लढवली.
नेमकं या शेतकऱ्यांने काय केलंय?
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक फायद्यासाठी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पाटखेड येथे एका शेतकऱ्याने चक्क उन्हाळी मूगाच्या शेतात गांजा लावला होता. गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनही या शेतकऱ्याने अवैध पद्धतीने गांजाची शेती केली. याची गुप्त माहिती अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाला समजली.
नंतर पोलिसांनी छापा टाकला असता, या शेतकऱ्याकडून तब्बल ६५ किलो गांजा पकडला. सोबतचं गांजाची ४०५ झाडे ताब्यात घेत तब्बल १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्या सचिन रमेश महाजन (राहणार ग्राम पाटखेड, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला.) या शेतकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक पोलीस तपास करत आहेत. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख आणि पोलीस कर्मचारी संदीप ताले यांनी ही कारवाई केली आहे.
गांजा तस्करीसाठी पोलीस लढवतायत वेगवेगळी शक्कल…
विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून सातत्याने अकोला पोलिसांच्या विशेष पथकाकडून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करांवर कारवाई केली जात आहे. एवढं असूनही गांजा तस्करांनी गांजा विक्रीसाठी वेगवेगळी शक्कल लढवली. जसे, मोटर सायकल, प्रवासी बॅग, शेतमाल, कापसाच्या ढिगासह अन्य पद्धतीने गांजाची वाहतूक केली गेली. मात्र, तरीही अकोला पोलिसांकडून हा गांजा पकडला जात आहे.