शेतकऱ्यांनी ५० टक्के थकीत बिल माफीच्या योजनेचा लाभ घ्यावा; जयंत पाटील यांचे आवाहन

वीज मंडळाच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीने वीज मंडळासमोर काही प्रश्न तयार झाले आहेत. सध्या महाआघाडीच्या राज्य सरकारने ५० टक्के थकीत बिल माफीची योजना सुरू केली असून, या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तुजारपूर (ता.वाळवा) येथील कार्यक्रमात केले.

  इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वीज मंडळाच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीने वीज मंडळासमोर काही प्रश्न तयार झाले आहेत. सध्या महाआघाडीच्या राज्य सरकारने ५० टक्के थकीत बिल माफीची योजना सुरू केली असून, या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तुजारपूर (ता.वाळवा) येथील कार्यक्रमात केले.
  जयंत पाटील यांच्या हस्ते तुजारपूर येथे आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, पं. स. उपसभापती नेताजीराव पाटील, प्रांताधिकारी संपतराव खिलारे, तहसीलदार प्रदीप उबाळे, गट विकास अधिकारी आबासाहेब पवार, जिल्हा मध्य. बँकेचे संचालक बाळासाहेब होनमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
  पाटील म्हणाले, आरोग्य उपकेंद्रांची इमारत लवकरच पूर्ण होईल. तत्पूर्वी आपल्या गावात डॉक्टर रुजू झाले आहेत. आपण सुरू केलेल्या मॉडेल स्कूल उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्याचा आपला प्रयत्न आहे. १२२ शिक्षक कमी आहेत. त्याबद्दल संबंधितांशी चर्चा करू. आपण गावाच्या वतीने दिलेल्या निवेदनांचा पाठपुरावा करू.
  माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील म्हणाले, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावास खास बाब म्हणून हे आरोग्य उपकेंद्र दिले आहे. यापूर्वी ग्रामपंचायत इमारत तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वॉटर एटीएम दिले आहे. त्यातून ग्रामपंचायतीस उत्पन्नाचा चांगला स्त्रोत मिळाला आहे.
  प्रारंभी सरपंच अस्मिता पाटील यांनी स्वागत, तर उपसरपंच संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस पाटील वसंतराव पाटील, माजी उपसरपंच उद्धव पाटील, युवक अध्यक्ष महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुषमा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली.
  शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या तक्रारीची तातडीने दाखल
  गावातील शेतकऱ्यांनी शेती पंपाच्या थकीत बिलाचा प्रश्न मांडला. पाच वर्षांनी एकदम लाख-दीड लाख बिले दिली असून, वीज कनेक्शनही तोडली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पाटील यांनी तातडीने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना समोर बोलावून त्यांनी सविस्तर चर्चा केली. बिलांची तपासणी करून ती दुरुस्त करून द्यावीत आणि चालूचे बिल भरून वीज सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.