मावळ तालुक्यातील तत्कालीन भूमी उपअधीक्षक स्मिता गौड यांच्यावर गुन्हा दाखल

मावळ तालुका हा पुणे व मुंबई या शहरांच्या मध्यावर असणारा तालुका असून, जमिनींना आलेला सोन्याचा भाव व झटपट पैसा मिळविण्याच्या नादात मावळमध्ये जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारामधील फसवणुकीचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. असे असताना मावळमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  वडगाव मावळ : मावळ तालुका (Maval Taluka) हा पुणे व मुंबई या शहरांच्या मध्यावर असणारा तालुका असून, जमिनींना आलेला सोन्याचा भाव व झटपट पैसा मिळविण्याच्या नादात मावळमध्ये जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारामधील फसवणुकीचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. असे असताना मावळमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मावळच्या तत्कालीन भूमी अधीक्षक स्मिता गौंड यांच्या विरोधात वडगाव मावळ (Vadgaon Maval) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मावळ तालुक्यातील लोणावळा-खंडाळा येथील जमिनींची अभिलेख कार्यालयातील मूळ दस्तावरील क्षेत्र कमी करुन त्या आधारे घेण्यात आलेल्या नोंदी रद्द होण्याबाबत तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने सदर प्रकरणाच्या अनुषंगाने महत्वाची कागदपत्रे असलेल्या फाईल संगनमताने फौजदारी पात्र कट रचून अपराधाचा पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक गहाळ केला. त्यामुळे मावळच्या तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक स्मिता गौड यांच्यावर वडगाव मावळ पोलिसात गुन्हा दाखल आहे. याबाबत मावळच्या भूमिअभिलेख उपअधीक्षक उर्मिला गलांडे यांनी फिर्याद दिली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील खंडाळा येथील सर्वे नं १०४ सिटी सर्वे नं ११बाबत १४ जून २०१९ पूर्वी सह जिल्हा निबंधक वर्ग-२अभिलेख मुंबई या क्षेत्रीत कार्यालयामध्ये १४ ऑगस्ट १९५१ रोजी नोंदणी करण्यात आलेले मूळ खरेदी दस्त क्रमांक- २६०७/१९५१ मधील दस्तावर एकूण क्षेत्र चार एकर ३८ गुंठे हे मूळ क्षेत्र खोडून त्याठिकाणी ३१ गुंठे असे क्षेत्र नमूद केले. खोटे क्षेत्र नमूद असलेल्या खरेदी दस्ताची प्रमाणित प्रत हस्तगत करुन त्याद्वारे नगर भू-मापक लोणावळा यांच्या कार्यालयात फेरफार व नोंदी रद्द होणेबाबत अर्ज सादर केला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांनी मूळ कागदपत्रात खाडाखोड करून तो दस्त गायब करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती.

  दरम्यान, जिल्हा भूमी अधीक्षक राजेंद्र गाळे यांनी पोरवाल यांचा अर्ज व सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी केली. सदर दस्त हे मावळ भूमी अभिलेख कार्यालयातून गहाळ झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मावळच्या विद्यमान भूमी अभिलेख उपअधीक्षक यांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  याप्रकरणात यापूर्वी लोणावळ्याचे तत्कालीन परिक्षण भूमापक विकास डेकळे यांना देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले होते. पोरवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुशंगाने उपअधिक्षक भूमिअभिलेख मावळ यांच्या दालनामध्ये प्रकरणाचे अनुशंगाने महत्वाची कागदपत्रे असलेली फाईल संगनमताने फौजदारी पात्र कट रचून अपराधाचा पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने जाणीवपूर्वक गहाळ केल्याचा गुन्हा दाखल करत गुन्ह्याचा अहवाल प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी, वडगाव मावळ यांना सादर करण्यात आली असल्याची माहिती वडगाव पोलीस उपनिरीक्षक विकास सस्ते यांनी दिली आहे.

  या प्रकरणात आता तर सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून मूळ दस्तऐवज थेट सरकारी कार्यालयातून गायब केल्याने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.