प्रथमच शेतकऱ्यांना केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेचा निकष पाळून दि.२७ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील सुधारित दर व निकषांप्रमाणे एकूण १९ कोटी ७३ लक्ष एवढी मदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळेल, असेही मंत्री पाटील म्हणाले.

    मुंबई : जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना नुकसानापोटी  १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी दिले. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे ‘केळी’ या बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आलेली आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. (First time compensation to farmers for CMV disease on banana crop – Relief and Rehabilitation Minister Anil Patil)
    शेतकऱ्यांना १९ कोटी ७३ लक्ष एवढी मदत 
    मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, तत्कालीन वादळी पावसाच्या तडाख्याने केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेल्या केळीबागांवर व्हायरसचे नवीन संकट आले होते. या रोगामुळे बाधित झालेले एकूण क्षेत्र ८७७१ हेक्टर एवढे होते. जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेचा निकष पाळून दि.२७ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील सुधारित दर व निकषांप्रमाणे एकूण १९ कोटी ७३ लक्ष एवढी मदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळेल, असेही मंत्री पाटील म्हणाले.