केंद्राकडून जिल्हा बँकेसाठी मदत करण्यास तयार; हर्षवर्धन पाटील यांची ग्वाही

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध निवडणुकीमुळे तालुक्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे.

  इंदापूर : पिक कर्जाची वसूली ३६५ दिवसांच्या मुदतीत होवू शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून काही धोरणात्मक बदल करावे लागतील. तोही मार्ग निश्चितपणे काढू, असे सांगून केंद्रीय सहकार खात्याच्या माध्यमातून बँकेला काही मदत लागली तर सांगा. ती मदत देण्यात आपल्या सर्वांचा सिंहाचा वाटा राहिल, अशी ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

  आप्पासाहेब जगदाळे यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झालेबद्दल त्यांचा पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. शिवन्या लॉन्समध्ये हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आप्पासाहेब जगदाळे, पृथ्वीराज जाचक, मारुतराव वणवे, ॲड.कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, तानाजी थोरात, बाळासाहेब डोंबाळे यांची यावेळी भाषणे झाली.

  ॲड. शरद जामदार यांनी प्रास्ताविक केले. रघुनाथ पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले. इंदापूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

  पुढच्या सर्व निवडणुका जिंकणार

  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध निवडणुकीमुळे तालुक्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. अल्पशा मतांनी गेल्या विधानसभेची निवडणूक हातून गेली असली तरी, पुढच्या सा-या निवडणुका जिंकून तालुक्याला गतवैभव मिळवून देऊ, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

  जगदाळेंसह तालुक्याचा सन्मान व्हावा

  पुणे जिल्हा बँकेचा सर्वाधिक रेव्हेन्यू इंदापूर तालुक्यातून जातो. तीन सहकारी साखर कारखाने, विकास संस्थांच्या पिक कर्जाचे, मध्यममुदत कर्जाचे वाटपही मोठ्या प्रमाणात होते. बारामती व दौंड तालुक्यांप्रमाणेच इंदापूर तालुक्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीमध्ये बरोबरीचा हिस्सा आहे. शेतक-यांच्या हितासाठी राजकारण बाजुला ठेवून काम करण्याच्या जगदाळे यांच्या पध्दतीमुळे निवडणूक लागली असती तरी ते निश्चितपणे विजयी झाले असते. शिरुर, हवेली, मुळशी येथील निवडणूक बिनविरोध झाली नाही. विरोधी पक्षात असताना इंदापूरची जागा बिनविरोध होणे ही स्वाभिमानाची बाब आहे. त्यामुळे जगदाळेंसह तालुक्याचा सन्मान झाला आहे, असे पाटील म्हणाले.

  इंदापूरच्या प्रतिनिधीचा सन्मान राखला जावा

  निवडणूकीच्या दरम्यान वरिष्ठ पातळीवर काही प्रयत्न झाले. आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा केली. सर्वांचे सहकार्य मिळाले. सर्वांनी आपला शब्द मान्य केला. ब-याच लोकांनी समजूतदारपणा दाखवला, असे पाटील म्हणाले. येत्या पाच वर्षात जिल्हा बँकेचे काम करताना, योग्य कामे असतील, बँकेच्या दृष्टीने मदत करण्याची भूमिका पार पाडली जाईल. तालुक्याच्या माध्यमांतून जगदाळे काय सांगतील ते सुध्दा आपण वरिष्ठ पातळीवरुन ऐकले पाहिजे, असा स्पष्ट संदेश ज्यांना कुणाला द्यायचा आहे त्यांना आम्ही दिला आहे. भविष्यात बँकेचे धोरणात्मक निर्णय घेताना इंदापूरच्या प्रतिनिधीचा सन्मान राखला गेला पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे. जर त्यामध्ये अडचण होते आहे असे जाणवल्यास जगदाळे यांनी आम्हाला सांगावे. परत वरिष्ठांशी चर्चा केली जाईल, असेही पाटील म्हणाले.