जिल्हा बँकेसाठी दौंडमधून राष्ट्रवादीत चुरस वाढली; थोरातांची उमेदवारी निश्चित तर नागवडे, जगदाळे, टुले, खेडेकर अनिश्चित

दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांच्याकडून देखील हालचाली सुरू झाल्या आहेत.

    राहू : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाच इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बँकेच्या निवडणुकीत चुरस वाढली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    जिल्हा बँकेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या बँकेवर एक हाती वर्चस्व आहे. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी या निवडणुकीत सलग आठव्यांदा ‘अ’ गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रमेश थोरात हे जिल्हा बँकेचे विद्यमान  अध्यक्ष असून सलग ३७ वर्ष ते जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी असलेली जवळीक व सहकारातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून माजी आमदार रमेश थोरात यांची ‘अ’ गटातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

    महानंदच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका जयश्री खेडेकर यांनी महिला राखीव मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वैशाली नागवडे या देखील पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीय असून, जयश्री खेडेकर या रमेश थोरात यांच्या समर्थक मानल्या जातात. या दोघीही दौंड तालुक्यातील खामगाव येथील रहिवासी असून महिला राखीव गटातून दोघींमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

    पुणे जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य व दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये ‘अ’, ‘क’ व ‘ङ’  मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते देखील उपमुख्यमंत्री मतदारसंघातून उमेदवारी अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

    तसेच कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष व दौंड तालुक्यातील धनगर समाजाचे नेते रामभाऊ टुले यांनी देखील ‘ङ’ मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

    एकंदरीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांची ‘अ’ वर्गातून उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी ,दौंड तालुक्यात जिल्हा बँकेच्या २१ पैकी २ जागा मिळाव्यात यासाठी थोरात प्रयत्नशील असल्याचे समजते. मात्र, जर एक जागा वाढली तर थोरात यांच्याबरोबर वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, रामभाऊ टुले व जयश्री खेडेकर यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अनिश्चित आहे.

    कुलांच्या भूमिकेकडे लक्ष..

    दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांच्याकडून देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांचे काही समर्थक आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. सन २००७ च्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल यांनी माजी आमदार रमेश थोरात यांच्या विरोधात ‘अ’ गटातून जोरदार तयारी केली होती.मात्र ऐनवेळी थोरात यांनी अजित पवार यांच्याशी जुळवून घेत ‘अ’ वर्गाची उमेदवारी स्वतःकङे घेतली.त्यामुळे  कुल यांना ‘क’ गटातून उमेदवारी देण्यात आली. याची सल अजूनही आमदार राहुल कुल यांच्या मनात असून यंदाच्या  निवडणुकीत आमदार राहुल कुल हे माजी आमदार रमेश थोरात यांच्या विरोधात जिल्हा बँकेच्या आखाड्यात शड्डू ठोकणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.