मराठवाड्यात प्रथमच भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन, सर्जा-राजांचा थरार

बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर मराठवाड्यात प्रथमच भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबादमध्ये शिवबा राजे प्रतिष्ठान यांच्यावतीने या स्पर्धा आयोजित केल्या असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 28 संघ व शेतकरी सहभागी झाले आहेत. 

    उस्मानाबाद : बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर मराठवाड्यात प्रथमच भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबादमध्ये शिवबा राजे प्रतिष्ठान यांच्यावतीने या स्पर्धा आयोजित केल्या असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 28 संघ व शेतकरी सहभागी झाले आहेत.

    दरम्यान बैल व गाडीसह शेतकरी दाखल झाले असून स्पर्धा रंगत आहेत. आई राजा उदो उदो , जय भवानी जय शिवाजी या घोषणा देत शेतकऱ्यांनी बैलगाडी स्पर्धेत भाग घेतला. शिवसेना खासदार ओम राजे निंबाळकर , आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, दरवर्षी स्पर्धा घेण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.

    मराठवाड्यात आता या स्पर्धा रंगू लागल्या

    तुळजापूरमध्ये अपसिंगा रोडवरील मैदानात या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडी शर्यत बंद होती. त्यामुळे शेतकरी व बैलगाडी मालक हे संकटात आले होते, बैलाची किंमत कमी होत होती मात्र आता शर्यत सुरु झाल्याने दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापुर, पुणे, या जिल्ह्यांतील गावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत भरवण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे मात्र मराठवाड्यात आता या स्पर्धा रंगू लागल्या आहेत.

    प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये

    बैलगाडा शर्यतीच्या बैलांना शेतकरी आपल्या मुलां प्रमाने संभाळतात अनेक अडचणींना सामोरे जात शर्यतीचे बैल जपले जातात. काही भागात तर बैलगाडा मालकाचे पोट याच शर्यतींवर अवलंबून असते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला असताना मराठवाड्यात सुद्धा आता या बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. उस्मानाबादमधील तुळजापूर येथे रंगलेल्या या स्पर्धेत विजयी जोडीस प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये द्वितीय 31 हजार रुपये तृतीय 21 हजार रुपयांचे पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे.