
एक्झिट पोलमध्ये दोन राज्यांत काँग्रेस आणि भाजपाची चुरस असेल असे सांगण्यात येत आहे. त्यात गोवा आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेनुसार पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये दोन राज्यांत काँग्रेस आणि भाजपाची चुरस असेल असे सांगण्यात येत आहे. त्यात गोवा आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेनुसार पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या तीनही राज्यात काँग्रेसची सरकारे स्थापन व्हावीत, यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आणि नेत्यांनी पूर्ण तयारी केली आहे.
गेल्या निवडणुकीच्या अनुभवाने शहाणी झालेल्या काँग्रेस पक्षाने, आमदार दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या गळाला लागू नयेत, यासाठी पूर्णपणे काळजी घेण्याचे ठरवले हे. यासाठी छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेषश बघेल यांच्याकडे उत्तराखंडची, अजय माकन यांच्याकडे पंजाबची तर कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्याकडे गोव्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियोजन असे आहे की गरज पडली तर काँग्रेसच्या आमदारांना एयर लिफ्ट करण्यात यावे, जास्तीत जास्त घोडेबाजार थांबवावा, अशी काँग्रेसची इच्छा आहे. देशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखादा राजकीय पक्ष आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एयरलिफ्ट करण्यापर्यंतचे नियोजन करीत आहे. यापूर्वी २०२० साली ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडावेळी भोपाळमधून २६ आमदारांना एयरलिफ्ट करण्यात आले होते, मात्र त्यावेळी काँग्रेस सोडण्यासाठी हा प्रकार घडला होता.
डेहराडूनमध्ये बघेल
उत्तराखंडच्या निकालात काँग्रेसला ३५ ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ऐनवेळी सत्ता स्थापनेचा दावा करण्यात किंवा काँग्रेस आमदार दुसऱ्या पक्षाकडे जाऊ नये, या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडून आलेल्या आमदारांना पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात ठेवण्यासाठी भूपेश बघेल सज्ज आहेत. अनेक ठिकाणाहून आमदारांना राजधानी डेहराडूनला पोहचण्यास वेळ लागू शकतो, हे लक्षात ठेवून त्यांना हेलिकॉप्टरने उचलण्यात येणार आहे. छत्तीसगडमधील बजेट मांडल्यानंतर बघेल हे उत्तराखंडमध्ये पोहचले आहेत. गुरुवारी निवडणूक निकालांनंतर ते पक्षाची पुढची रणनीती निश्चित करणार आहेत. भाजपाने कुठल्याही प्रकारे आपल्या उमेदवारांशी संपर्क साधू नये, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडे भाजपाने तीन दिवसांपूर्वीच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कैलास विजयवर्गीय यांना डेहराडूनला पाठविले होते. माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनाही सक्रिय करण्यात आले आहे.
गोव्यात डी के शिवकुमार
गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा असूनही निर्णय प्रक्रिया उशीरा झाल्याने भाजपाला सत्ता मिळाली होती. त्यामुळे गोव्याचे काँग्रेस प्रभारी चिदम्बरम आत्तापासूनच तिथे पोहचलेले आहे. एका वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने अनेक भावी आमदारांना दोन हॉटेलांत हलविण्यातही आले आहे. याचसोबत कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांनाही गोव्यात पाठवण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला कसा करावा याचे चांगले ज्ञान त्यांच्याकडे आहे.
पंजाबमध्ये काँग्रेस माकन यांच्या भरवश्यावर
अजय माकन हे राजस्थान काँग्रेसचे प्रभारी आहेत. सीएम अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद कमी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळेच त्यांना पंजाबात काँग्रेसात फूट पडू नये ही जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबात एक्झिट पोलमध्ये जरी आप सरकार स्थापेल असे असले, तरी काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात इथे काँग्रेसही सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेवून काँग्रेसने यावेळी रणनीती आखलेली आहे.