शंभूराज देसाई यांना सत्तेची उर्मी व धुंदी; माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा घणाघात

कोणत्याही आमिषाला जिल्हा बँकेचे मतदार बळी पडले नाहीत. काहींना सत्तेची उर्मी व धुंदी होती. माणसे विकत घेण्याची भाषा ऐकायला मिळत होती. त्यामुळे जिल्हा बँकेचे हे मतदार जनावरे नसून माणसे आहेत, याचे भान त्यांनी ठेवावे.

  पाटण : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत (Satara District Bank Election) राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला विजय हा सर्वसामान्य मतदारांचा व जनतेचा विजय आहे. कोणत्याही आमिषाला जिल्हा बँकेचे मतदार बळी पडले नाहीत. काहींना सत्तेची उर्मी व धुंदी होती. माणसे विकत घेण्याची भाषा ऐकायला मिळत होती. त्यामुळे जिल्हा बँकेचे हे मतदार जनावरे नसून माणसे आहेत, याचे भान त्यांनी ठेवावे. पाटण तालुका गेली दोन वर्ष सत्तेची मस्ती व धुंदी अनुभवत आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (Vikramsinh Patankar) यांनी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर केली.

  जिल्हा बँकेत विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी उंब्रज ते पाटण दरम्यान जल्लोष मिरवणूक काढली. सायंकाळी ७ वाजता मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. निकाल लागताच कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी जोरदार जल्लोष केला. उंब्रज ते पाटण दरम्यान विजयी उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांची जोरदार मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

  यावेळी विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, सत्ता ही सर्वसामान्य जनतेसाठी राबवायची असते. आम्ही जिल्हा बँकेची सत्ता कायम सामान्य जनतेसाठी राबविल्याने जनता आमच्या पाठीशी ठाम राहिली. सहकारात काम करत असताना सर्वसामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करायचे असते. मात्र, काही प्रवृत्ती अशा असतात की सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा, त्यामुळे अशा प्रवृत्तीला जिल्हा बँकेतून हद्दपार केले आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेसवर सध्या विश्वासघाताचा आरोप केला जात आहे. जिल्हा बँकेतील राष्ट्रवादीची सत्ता आहे. फार वर्षांपूर्वीची आहे ही सत्ता आत्ताची नवीन नाही. त्यामुळे असा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी दिला.

  १९८० ते १९८३ साली असाच उठाव झाला होता. तालुक्यात सत्तापरिवर्तन झाले होते. युवकांनी आता परिवर्तन घडवणे गरजेचे आहे. तालुक्यात जनतेशी मुजोरपणे वागण्याचे फळ मिळाले आहे. इथून पुढे अजूनही मोठे फळ मिळेल. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यानंतर सत्तेचा दुरुपयोग कसा होतो, हे आपण पाहिले असल्याचेही माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी मंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न घेता केली.

  पिक्चर अभी बाकी है…

  पाटण मतदारसंघातील जिल्हा बँकेची निवडणूक ही राज्यात चर्चेचा विषय होती. विरोधकांनी जिल्हा बँकेची सत्ता विकत घेऊ अशी घोषणाबाजी केली होती. मात्र, स्वाभिमानी मतदारांनी त्यांचा पराभव करून आज दाखवून दिले आहे. सत्तेची गुर्मी व पैशांची मस्ती चालत नाही.

  जिल्हा बँकेतील माझा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्ते जनता व मतदारांचा आहे राष्ट्रवादी वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हा विजय मिळवून दिला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेत मिळालेला विजय हा भविष्यातील निवडणुकांची नांदी आहे. हा ट्रेलर होता. ‘पिक्चर अभी बाकी है’ असे म्हणत सत्यजितसिंह पाटणकर यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना आगामी निवडणुकीसाठी आव्हान दिले आहेत.