कार्यक्रमासाठी गेलेले चार मित्र परतलेच नाही, झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात चौघांनी गमावले प्राण

अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर होऊन त्यातील 5 पैकी चार जणांचा मृत्यू झाला. तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे अशी मृतांची नावं आहेत.

    नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर मनमाडजवळ झाडावर कार आदळून भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (four friends died in Road Accident). 5 मित्र सियाज मारुती कारमधून येवल्याकडून मनमाडला येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने कट मारला. यामुळे चालकाचं कारवरुन नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला.

    अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर होऊन त्यातील 5 पैकी चार जणांचा मृत्यू झाला. तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे अशी मृतांची नावं आहेत. तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी असून त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अपघाताची माहिती मिळताच मयतांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली. या अपघातानंतर पुणे-इंदौर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमीला रुग्णालयात आणण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर वाहतूक सुरळीत केली गेली.