चारचाकी-दुचाकी चोरणारा जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमालही जप्त

जिल्ह्याच्या उत्तरेतून तसेच जालना, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यामधून चारचाकी, दुचाकी वाहने चोरणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद (Crime in Ahmednagar) केला. या कारवाईत पोलिसांनी १४  लाख ६० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

  नगर तालुका : जिल्ह्याच्या उत्तरेतून तसेच जालना, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यामधून चारचाकी, दुचाकी वाहने चोरणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद (Crime in Ahmednagar) केला. या कारवाईत पोलिसांनी १४  लाख ६० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संजय रावसाहेब चव्हाण (वय ३०, रा. रांजणी, ता. शेवगाव, हल्ली रा. ब्राम्हणगाव, ता. श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

  पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेप्रमाणे सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ मनोज गोसावी, पोना संतोष लोंढे, दीपक शिंदे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, पोकॉ रवींद्र घुंगासे, रणजीत जाधव, सागर ससाणे, जालिंदर माने, उमाकांत गावडे, भारत बुधवंत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

  पिकअप चोरी तपासात मिळाली माहिती

  पिकअप टेम्पो चोरीस गेल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस निरीक्षक कटके यांना संजय चव्हाण व त्याच्या साथीदारांच्या गुन्ह्यांची माहिती मिळाली. कटके यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस पथकाने सापळा लावून संजय चव्हाण यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडील ३ लाख ३५ हजार रूपयांचा टेम्पो हस्तगत केला.

  पैठण, अंबड,शेवगाव, नेवाशात चोऱ्या

  आरोपीने कोठे-कोठे गुन्हे केले आहेत, याबाबत पोलिसांनी तपास केला असता, त्याने शेवगाव, नेवासा, सोनई, अंबड, पैठण आदी ठिकाणाहून यापूर्वी डीव्हीआर, मोबाईल, कॉम्प्युटर, मोटारासायकल, पिकअप अशा वाहनांची व साहित्यांची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून पिकअप टेम्पो, मोटारसायकल, मोबाईल, कॉम्प्युटर, डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर असा १४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.