‘अतिसुरक्षित’ ठिकाणांवरून चंदनचोरी करणाऱ्या टोळीला पकडले; तब्बल १६ गुन्ह्यांची उकल

पुण्यातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या संस्था तसेच अतिसुरक्षित परिसरातूनच चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आले आहे. चतुश्रृंगी पोलिसांनी चौघांच्या टोळीला पकडत त्यांच्याकडून शहरातील तब्बल १६ गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यांच्याकडून चालू वर्षातील सर्वच गुन्हे उघड झाले आहेत.

  पुणे : पुण्यातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या संस्था तसेच अतिसुरक्षित परिसरातूनच चंदनाची झाडे (Sandalwood) चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आले आहे. चतुश्रृंगी पोलिसांनी चौघांच्या टोळीला पकडत त्यांच्याकडून शहरातील तब्बल १६ गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यांच्याकडून चालू वर्षातील सर्वच गुन्हे उघड झाले आहेत.

  देवाराम अंकुश चव्हाण (वय ३३), निखील प्रवीण भोसले (वय २१), करण शरन्या भोसले (वय २१), नसरूद्दीन हिरामण भोसले (वय २०, सर्व. रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. शहरातील अतिसुरक्षित असणारी सरकारी कार्यालये, एनसीएस तसेच लष्कर परिसरातील बंगल्यांमधून गेल्या काही दिवसांमध्ये चंदनाची झाडे चोरीला जात होती. त्यातही बाणेरमधील नॅशनल केमिकल लॅबोरिटरीमधून (एनसीएल) दिवसांत तीनवेळा चंदनचोरी झाली होती.

  याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीसांत गुन्हे दाखल होते. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे व त्यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. परिसरातील सीसीटीव्ही पडताळण्यात आले होते. गेली अनेक दिवस पोलीस या टोळीच्या मागावर होते. परंतु, त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. यादरम्यान, बातमीदारामार्फत या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले व त्यांच्या पथकाने बारामती तालुक्यातील कोराळे गावातून या चौघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानतंर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.

  त्यांच्याकडून शहरातील १६ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. तर, साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, प्रकाश आव्हाड, बाबा दांगडे व त्यांच्या पथकाने केली आहे.

  दिवसा हेरगिरी अन् रात्री चोरी…

  शहरातील विविध भागात चौघे फिरत. शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणींची माहिती घेऊन त्या ठिकाणी चंदनाची झाडे असल्यास दिवसभर त्याची माहिती काढत. त्यानंतर मध्यरात्री येऊन चंदनाची झाडे चोरून नेत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून चतुश्रृंगी, वानवडी, कोंढवा, बंडगार्डन, भारती विद्यापीठ, विमानतळ, उत्तमनगर, सासवड या परिसरातील गुन्हे उघडकीस आले आहेत.

  देवाराम हा चालक म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला पुण्यातील बऱ्यापैकी माहिती आहे. तर, निखील आणि करण हे दोघेही नारळ विक्रेते आहेत. तर, नसरूद्दीन हा त्यांचा मित्र आहेत. त्यांनी चोरलेले चंदन त्यांच्या घरात साठवून ठेवले होते, असे सांगण्यात आले आहे. त्यांनी गुन्हा करण्यासाठी कारचा वापर केला असल्याचे समोर आले आहे.