होय ! चक्क सायकलने केली दक्षिण भारताची भ्रमंती; ५ राज्यातून तब्बल ४५०० किलोमीटरचा प्रवास

गणपत पवार (Ganpat Pawar) यांनी सायकलने संपूर्ण दक्षिण भारत दौरा पूर्ण केला. सुमारे साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण करताना महाराष्ट्रासह कर्नाटक, केरल पुद्दुचेरी, तमिळनाडू, आंध्रप्रदेश या पाच राज्यांतून प्रवास केला. यातील सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास समुद्र काठाच्या भागातून झाला.

  सांगली : येथील गणपत पवार (Ganpat Pawar) यांनी सायकलने संपूर्ण दक्षिण भारत दौरा पूर्ण केला. सुमारे साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण करताना महाराष्ट्रासह कर्नाटक, केरल पुद्दुचेरी, तमिळनाडू, आंध्रप्रदेश या पाच राज्यांतून प्रवास केला. यातील सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास समुद्र काठाच्या भागातून झाला.

  गणपत पवार यांनी पंढरपूर येथून गेल्या १५ नोव्हेंबरला मोहिमेस सुरुवात झाली. सांगली, कोल्हापूर मार्गे कर्नाटक राज्यातील बेळगाव, हुबळी, घारवाड यल्लापूर येथील ४० ते ६० किमीचा संपूर्ण प्रवास जंगलातून झाला. त्यानंतर गोकर्ण, महाबळेश्वर, मुरडेश्वर, उडपी, मंगरूळ मार्ग केरळ राज्यात प्रवेश केला. केरळ राज्यातील कासारगोड, कन्नूर, काजीकोड, कालीकत, मोठे, मल्लापुरम, एर्नाकुलम, कोचीन, पांडेचेरी, कोल्लम यासह केरळ राज्यातील १९ जिल्ह्यांतून मोहीम जिथे ‘वास्को द गामा’ यांनी केरळात प्रवेश केला. तिथे भेट दिली.

  केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम व त्रिवेंद्रम येथील मंत्रालय आणि पद्मनाभनस्वामी मंदिर येथे दर्शन घेतले. केरळ राज्यात सायकलने प्रवास करत असताना मुसळधार पाऊस, बैगवाण चारे यास तोंड दिले. केरळ राज्यातील संपूर्ण प्रवास समुद्र काठी झाला. कोचीन येथील निसर्गनिर्मित बंदराला भेट दिली. विलिंग्डण चायनिस पद्धतीने मासेमारी, जग प्रसिद्ध वस्तुसंग्रहालय, जहाज निर्मितीचा कारखाना या ठिकाणी भेटी दिल्या. एर्नाकुलम येथील ज्यु वसाहत, डच महाल, ऐतिहासिक वास्तुबरोबर सन १३४३ मध्ये उभारण्यात आलेल्या ज्यू मंदिरासही भेट दिली.

  केरळनंतर तमिळनाडू राज्यात प्रवेश केला. तिथून कन्याकुमारी येथील श्री स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकास भेट दिली. यानंतर रामेश्वर येथील मंदिरास भेट दिली. तेथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म स्थळाची भेट अविस्मरणीय अशीच ठरली. तिथून हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांचे मिलन असलेला व भारत देशाची शेवटची सीमारेषा ज्या ठिकाणी संपले धनुष्यकोडी येथे भेट दिली. तिथून फक्त २५ किलोमीटरवर श्रीलंका हा देश आहे.

  तमिळनाडू राज्यातील मदुराई, तिरुचिरापल्ली, चिदंमबरम, तिरुवन्नमलई, कांचीपुरम, श्रीकालहस्ती येथील पृथ्वीतलावरील एकमेव असणाऱ्या जलतत्त्व, आकाशतत्त्व, अग्नितत्त्व, वायुतत्त्व, पृथ्वीतत्त्व अशा पाचही तत्त्वांच्या मंदिराना भेट देणारी एकमेव सायकल वारी ठरली. तिरुअनंतपुरम येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मस्थळासही भेट दिली. दक्षिण भारतातील मराठी राजधानी तंजावरला भेट दिली.

  सामाजिक संदेश देत केली वारी

  ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, सायकल चालवा, निरोगी राहा, पर्यावरण वाचवा, निसर्ग वाचवा असा संदेश देत दक्षिण भारत सायकल वारी केली. या सायकल वारीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.