नागपुरात ९५ प्रकारचे विदेशी मद्य स्वस्त; उत्पादन शुल्क विभागाची माहिती

मुंबई विदेशी मद्य व शुद्ध मद्यार्क वाहतूक शुल्क नियम-१९५४मध्ये सुधारणा करण्यात आल्याने आयात होणाऱ्या विदेशी मद्याच्या किमतीत घट झाली आहे. आयात शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्के करण्यात आल्याने ९५ प्रकारच्या मद्याच्या किमतीत घट झाली असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

  नागपूर (Nagpur) : मुंबई विदेशी मद्य व शुद्ध मद्यार्क वाहतूक शुल्क नियम-१९५४मध्ये सुधारणा करण्यात आल्याने आयात होणाऱ्या विदेशी मद्याच्या किमतीत घट झाली आहे. आयात शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्के करण्यात आल्याने ९५ प्रकारच्या मद्याच्या किमतीत घट झाली असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

  राज्य शासनाचे उपसचिव युवराज अजेटराव यांनी १८ नोव्हेंबर रोजी याबाबतची अधिसूचना काढली. गृह विभागाचे अवर सचिव सु. श. यादव यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना याबाबतचे पत्र पाठवून नव्या बदलाची माहिती दिली. महाराष्ट्र पेय मद्य नियम-१९९६ मध्येही सुधारणा करण्यात आल्यानंतर इतर विभागही कामाला लागले. आयात दारांकडून मद्याच्या किमतीत घसरण करण्याबातचे अर्ज उत्पादन शुल्क विभागाकडे सादर करण्यात येत आहेत. ज्यांनी यापूर्वीच जुना साठा आणलेला आहे तो पूर्वीच्या दरानेच विकला जाईल. नव्या आयात होणाऱ्या मद्यातच ही सुधारित किंमत लागू असणार आहे. काही मद्याच्या सुधारित किमती यायला १० ते १५ दिवस लागू शकतात, असा अंदाज उत्पादन शुल्क विभागाकडून वर्तविण्यात आला.

  असे आहेत नवे दर
  मद्य : पूर्वीचे दर : नवे दर

  १) जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की (७५० मिली) : ५७६० : ३७५०

  २) जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की (७५० मिली) : ३०६० : १९५०

  ३) जे अॅण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की (७५० मिली) : ३०६० : २१००

  ४) गॉर्डन्स लंडन ड्राय जीन (७५० मिली) : —- : १६५०

  अवैध वाहतूक थांबेल
  महाराष्ट्रात विदेशी मद्यावरील आयात शुल्क अधिक असल्याने राज्यात येणारे मद्य अधिक किमतीत पडत होते. त्यामुळे इतर राज्यातून महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत होती. आता महाराष्ट्रातील विदेशी मद्य इतर राज्यांप्रमाणे स्वस्त होणार असल्याने या अवैध वाहतुकीला आळ‌ा बसेल, असे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.