मुलांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद, 12 ते 15 वयोगटातील मुलांनाही लस देण्याची केंद्राकडे मागणी; राजेश टोपे यांची माहिती

लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील. आता 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मागणी केंद्राकडे केली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

    जालना : लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील. आता 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मागणी केंद्राकडे केली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

    आज जालन्यात टोपे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. राज्यात ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाऊनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे. त्यामुळे लॉकडाऊन बाबत राज्यांना समान निकष असायला हवे असंही टोपे म्हणाले. मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची आमची ईच्छा होती पण लसीकरणामुळे लहान मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये लसीकरणाचं नियोजन केलं असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

    राज्यात सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांनी प्रत्येक कार्यक्रमात गर्दी टाळावी असंही टोपे यांनी सांगितल. कोरोना वाढत असल्यानं प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. केंद्र सरकारने वैद्यकीय सुविधेसाठी 23 हजार 123 कोटी रुपयेनिधी निधी राज्यांना दिला होता त्यावर राज्यांनी फक्त 17 टक्के पेक्षा कोणत्याही राज्याने वापरला नाही असा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केला. यावर बोलताना टोपे यांनी खर्च कसाही करून चालत नाही. त्याचं नियोजन करावं लागतं. हा निधी खर्च करण्यासाठी आढावा बैठक घेणार असल्याचे देखील टोपे म्हणाले.

    दरम्यान लॉकडाऊन बाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा अशी मागणीही केंद्राकडे केली असल्याचं ते म्हणाले. शाळेमध्ये लसीकरण करण्यासाठी लवकर निर्णय घेऊ असंही टोपे यांनी सांगितलं आहे.