दुष्काळी भागाची योजना पूर्ण होताना आमदारकी पेक्षाही मोठा आनंद : आमदार जयकुमार गोरे

जनतेची स्वप्नपुर्ती, पाण्यासाठी बोगद्याने जोडला माण-खटाव

  दहिवडी : खटाव तालुक्यातील नेर तलावापासून आंधळी धरणात पाणी सोडण्याच्या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून लवकरच पाणी सोडले जाणार आहे. दुष्काळी भागातील जनतेला मी पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले होते ती स्वप्नपुर्ती झाली आहे. जिहे कटापूर योजना पूर्ण होत असताना मला आमदार झालो त्यापेक्षाही मोठा आनंद होत आहे, अशी भावना आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.

  माण- खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी असलेल्या जिहे कटापूर पाणी योजनेच्या नेर तलाव (ता. खटाव) ते आंधळी धरण (ता. माण) या चौदा किलोमीटर अंतर असलेल्या बोगद्याच्या पूर्णत्वास आलेल्या कामाच्या पाहणी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता निकम,माजी जिल्हापरिषद सदस्य अरुण गोरे, संजय गांधी, युवा नेते सिद्धार्थ गुंडगे आदी समवेत होते.

  आमदार गोरे म्हणाले, जिहे- कटापूर पाणी योजना पूर्ण करण्यासाठी झपाटल्यासारखे काम करावे लागले असून यावर चौदा वर्ष प्रयत्न करीत असल्याने नेर तलाव ते आंधळी धरणापर्यंतचा चौदा किलोमीटर लांबीचा बोगदा पूर्णत्वास आला आहे. या योजनेला गेल्या बावीस वर्षापासून केवळ मान्यता होती. मात्र योजना तशी सातत्याने निधी अभावी रखडली गेली होती. माण-खटावच्या दुष्काळी भागात पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी देता येणार नसल्याचे स्वतःला जनतेचे राजे म्हणवणारे शरद पवार म्हसवड भागात आल्यानंतर सांगत होते. इथल्या भागाला पाणी देण्यासाठी पाणी उचलून आणायचं कुठून हा त्यांचा प्रश्न होता. मी ज्यावेळी आमदार झालो, दुष्काळी भागातील जनतेला मी पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले होते त्या स्वप्न पुर्तीसाठी चौदा वर्षापासून झपाटून काम करीत आहे . प्रचंड इच्छा शक्ती असल्यानंतर व त्याला पाठबळ मिळाल्यानंतर हे शक्य झालेल आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठबळाच्या जोरावर व मी ज्यावेळी आमदार झालो त्या-त्यावेळच्या सरकारने मला मदत केली, कधी कधी संघर्ष करावा लागला. त्यामुळे निधी आणला गेला. हे काम चालू राहील यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न सुरु ठेवावा लागला. दोन चार मीटरच काम करून चौदा किलोमीटरचा बोगदा पुढ नेण हा मोठा अडचणीचा भाग होता. प्रामाणिकपणे काम करून घेतलेल्या मेहनतीचे हे असलेल फळ म्हणजे हा बोगदा होय. आता माण- खटावचा दुष्काळ निश्चितपणे हाटेल, नेर तलावातून आंधळी धरण, माणगंगा नदीमधून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल. मला हे पूर्ण झालेलं काम पाहून आणि पाणी पोहोचल्यानंतर मोठा आनंद होत असून जेवढा मला आमदार झाल्यानंतर झाला नाही त्यापेक्षाही मोठा आनंद आज होत आहे.

  सगळ्यात महत्वाच म्हणजे बोगद्यापेक्षाही याच्या मागे व पुढेही प्रचंड वेगाने कामं सुरु आहेत. आंधळी धरणामधून पाणी उचलण्यासाठीची कामे सुद्धा वेगाने सुरु आहेत. २८७ कोटीची असलेली ही योजना अडीच हजार कोटीकडे वाटचाल करीत आहे. यामधून वाढीव कामे करण्याचे काम सुरु आहे. नेर मधून दोन व आंधळी मधून एक उपसा सिंचन योजना आपण करतोय, तर एक मंजूर होऊन काम सुरु करण्यात आले आहे. नव्याने सव्वा टीएमसी पाणी मंजूर झाले असून सव्वातीन टीएमसी पाणी या बोगद्यातून जाणार आहे. या पाण्याच्या माध्यमातून सुमारे पस्तीस एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

  “प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने”त जिहे कटापूर योजना
  ही योजना गुरुवर्य कै.लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना या नावाने ओळखली जाते, योजना मार्गी लावण्यास तत्कालीन राज्य सरकार फार उदासीन होते. या अनुशंघाने आम्ही सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तीन वेळा भेटलो होतो. त्यावेळी मोदी साहेबांनी या योजनेच्यासंदर्भात माहिती घेतली होती, या योजनेला राज्यसरकार निधी देत नाही,मदत करीत नाही म्हणून त्यांनी “प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने”त जिहे कटापूर योजनेचा समावेश केला. योजनेला गती देण्यासाठी तातडीने अडीचशे कोटी मंजूर करून केंद्र सरकारकडून खाली पाठवले. तसेच आणखी निधी कमी पडल्यास उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले आहे. वाढीव योजनेसाठी पाचशे कोटींची आवश्यकता असून तोही निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही योजना मार्गी लावण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे प्रचंड मोठ योगदान आहे. या योजनेच्या शुभारंभासाठी देशाचे पंतप्रधान यावेत, त्यांच्या हस्ते या पाणी पूजन व्हावे अशीही आमची भावना आहे, देशाचे पंतप्रधान या भागात आल्यास आणखी निधी मिळून काम मार्गी लागण्यास मदतच होणार असल्याचे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले .

  आमदारांची अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप
  योजनेचे काम करीत असताना अधिकारी वर्ग पूर्ण ताकदीने काम करीत आहेत, काम करीत असताना ते कसे तातडीने पूर्ण होईल याकडे त्यांचे चांगले लक्ष असल्याने पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे या अधिकार्यांचे कौतुक केले पाहिजे.