अभय योजनेतून मागील वर्षी दंडमाफी मिळवलेले निम्मे नागरिक पुन्हा थकबाकीदार !

गेल्या वर्षी अभय योजनेचा फायदा घेऊन दंडमाफी मिळवलेल्या दीड लाख थकबाकीदार मिळकतदारांपैकी ७२ हजार ७०० मिळकतदारांनी यावर्षी पुन्हा १७४ कोटी रुपये थकवले आहे. यामुळे अभय याेजना राबविण्याच्या हेतू साध्य हाेताे की नाही याविषयी शंका निर्माण झाली आहे.

  पुणे : गेल्या वर्षी अभय योजनेचा फायदा घेऊन दंडमाफी मिळवलेल्या दीड लाख थकबाकीदार मिळकतदारांपैकी ७२ हजार ७०० मिळकतदारांनी यावर्षी पुन्हा १७४ कोटी रुपये थकवले आहे. यामुळे अभय याेजना (Abhay Yojana) राबविण्याच्या हेतू साध्य हाेताे की नाही याविषयी शंका निर्माण झाली आहे.

  यांसर्दभात सजग नागरिक मंचने लक्ष वेधले आहे. सदर मिळकतदारांना देण्यात आलेली दंडातील माफी रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी महापालिकेने तीन वेळा अभय याेजना राबविली आहे. सध्या आणखी एक अभय याेजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या याेजनेत सुमारे एक काेटी रुपयांपर्यंतची थकबाकी असणाऱ्या मिळकतींवरील दंडाच्या रक्कमेत ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. अभय याेजना सातत्याने राबविणे हे धाेक्याचे ठरू शकते. यापेक्षा नियमितपणे मिळकत कर भरणाऱ्यांना करात सवलत दिली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

  याविषयासंदर्भात मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी पुणे महापालिकेने थकीत मिळकत कर वसुलीसाठी अभय योजना आणली होती. ज्यात थकबाकीदारांचा ७५ टक्के दंड माफ करण्यात आला. या योजनेचा लाभ घेऊन गेल्यावर्षी १ लाख ४९ हजार ७०० थकबाकीदार मिळकतदारांनी कराची थकबाकी भरली. आता या सर्व मिळकतदारांनी यंदाच्या वर्षी वेळेवर मालमत्ता कर भरला आहे का याची माहिती अधिकार दिवशी बघितली असता अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे.’’

  आकडे काय सांगतात ?

  – गेल्या वर्षी १ लाख १९ हजार २७२  निवासी मिळकतदारांनी धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला , त्यापैकी ५८ हजार मिळकतदारांनी यंदा एकूण ५४ कोटी रुपये थकवले आहेत.

  – गेल्या वर्षी २३ हजार ३२  बिगरनिवासी मिळकतदारांनी अभय योजनेचा फायदा घेतला. त्यापैकी यंदा ११ हजार जणांनी १०३ कोटी रुपये थकवले आहेत.

  – गेल्या वर्षी माेकळी जागा या वर्गातील ३ हजार १४८ मिळकतदारांनी अभय योजनेचा फायदा घेतला. त्यापैकी १ हजार ३०० जणांनी एकुण ९ काेटी रुपये थकविले आहे.

  – गेल्या वर्षी मिश्र वापराच्या ४ हजार २५६ मिळकतदारांनी अभय याेजनेचा लाभ घेतला. यंदा त्यापैकी २ हजार मिळकतदारांनी साडे आठ काेटी रुपये थकविले आहे.

  – एकूण ७२७०० मालमत्ताधारकांनी यंदा परत १७४ कोटी रुपये थकवले आहेत.

  ‘‘मुळातच थकबाकीदारांना अभय योजना म्हणजे नियमितपणे कर भरणाऱ्या प्रामाणिक नागरीकांना त्यांच्या वक्तशीरपणा ची  एक प्रकारची शिक्षा च आहे.  या अभय योजनेचा फायदा घेणाऱ्या मालमत्ता धारकांनी यंदाच्या वर्षी परत कर थकवणे म्हणजे त्यांची कर भरण्याची मानसिकता नसल्याचे दाखवून देते. गेल्या वर्षी अभय योजनेचा फायदा घेऊन दंडमाफी मिळवलेल्या  थकबाकीदार मालमत्ताधारकांपैकी यंदा पुन्हा थकबाकीदार झालेल्या मालमत्ता धारकांना  गेल्या वर्षी दिलेली दंडमाफी रद्द करण्यात यावी व त्याचा बोजा परत त्यांच्या मालमत्ता करात चढविण्यात यावा.’’

  – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच