डेंग्यूग्रस्त स्थितीने हैराण; अस्वस्थ मुश्रीफ यांची अवचितवाडीकडे धाव

  मुरगूड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : डेंग्यूची साथ कमी येईपर्यंत आरोग्य विभागाच्या पथकाने गाव सोडायचे नाही. मुरगुड ग्रामीण रुग्णालयात अवचितवाडीतून येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला डेंग्यू चाचणी केल्याशिवाय जाऊ देऊ नका. दररोज गावातील प्रत्येक घरातील सदस्यांची तपासणी करा. डेंग्यू व इतर आजाराने गंभीर रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट करून घ्या. त्यांच्या उपचारामध्ये कोणतीही हयगय करू नका. मुरगुड ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात सक्त कारवाई करू, अशी सक्त ताकीद ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

  डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना हसन मुश्रीफ फाऊंडेशन २५ हजार रुपयांची मदत करेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

  अवचितवाडी ता. कागलमध्ये सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कागलचे आमदार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या गावात आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील बिद्रीचे संचालक प्रवीण सिंह भोसले कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे उपस्थित होते. यावेळी मुश्रीफ यांनी गावात फिरून वैद्यकीय कार्यवाहीचा आढावा घेतला.

  अवचितवाडी येथील ग्रामदैवताच्या मंदिरात झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागले. मुश्रीफ यांच्या समोर ग्रामस्थांनी आपले गाऱ्हाणे मांडले. मुरगूड ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू रुग्णांना बेड शिल्लक असतानाही ऍडमिट करून घेत नाहीत. डेंग्यू टेस्ट खाजगी लॅबमध्ये करण्यास सांगतात.

  प्लेटलेट कमी असणाऱ्या रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाण्यास सांगतात. अशा अनेक तक्रारी अवचितवाडी ग्रामस्थांनी आमदार मुश्रीफ यांना सांगितल्या. यावर मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या वर्तणुकीत बदल करून ग्रामस्थांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा तातडीने पुरवाव्यात अशी सूचना केली. पुन्हा तक्रार आली तर संबंधितांवर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

  याप्रसंगी ग्रामस्थांनी डेंग्यूसदृश आजाराने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना शासनाकडून काही मदत मिळत असेल तर मंत्री मुश्रीफ यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी केली हाच धागा पकडून आपल्या भाषणात मुश्रीफ म्हणाले अशाप्रकारे डेंग्यूसाठी कोणतीही मदत शासनपातळीवर केली जात नाही. पण हसन मुश्रीफ फाऊंडेशन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत करून त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली.

  आढावा बैठकीत कृष्णात कापसे, युवराज सुतार, सातापा अंगज, रणजीत पारेकर यांनी आपली मते मांडली.

  स्वागत आणि प्रास्ताविक सरपंच उत्तम पाटील यांनी केले आभार पांडुरंग गायकवाड यांनी मानले.

  यावेळी रणजित सूर्यवंशी, पांडुरंग साळोखे,मुरगूड ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान डवरी, बीडीओ उपस्थित होते.

  तुकाराम गायकवाड, शिवाजी भारमल, तानाजी उपलाने, सागर बोटे, विनायक भाइंगडे, आदित्य तळेकर, कृष्णात उपलाने, भैरवनाथ धनवडे, संभाजी मोरबाळे, श्रीकांत भाईंगडे, शितल मोरबाळे यांच्यासह आरोग्य पर्यवेक्षक सुधीर खाडे, वैद्यकीय अधिकारी नेहा शेवाळे, आरोग्यसेवक जे. के. कांबळे उपस्थित होते.