शेतात गेला तो परतलाच नाही, दोन दिवसांनंतर विहिरीत मृतदेहच सापडला

  नागपूर (Nagpur) : शेतात गेलेला युवक दोन दिवस झाले तरी घरी परतला नाही. रात्री नऊ वाजता शेतातील मोटार सुरू करण्यासाठी तो गेला होता. दोन दिवसांनंतर त्या शेतकऱ्याचा मृतदेहच शेतातील विहिरीत तरंगताना दिसला. त्यामुळं त्याचा अंधारात विहिरीत बुडून मृत्यू झाला की, कुणी मारून फेकले याबाबत शंका-कुशंकांना पेव फुटले आहे. ही घटना नरखेड तालुक्यात मंगळवारी उघडकीस आली.

  शेतावर गेला तो परतलाच नाही
  रमना येथील शिवलाल जंगी उईके हा 35 वर्षांचा तरुण शेतात गेला होता. नरखेड तालुक्यातील मोहदी (धोत्रा) शिवारात त्यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला. नरखेडच्या इशान पठाण यांनी मोहदी शिवारात साडेचार एकर शेती ठेक्यानं घेतली आहे. शिवलाल उईके हा त्यांच्या शेतात काम करत होता. रविवारी रात्री नऊ वाजता वीज पुरवठा सुरू होणार होता. त्यामुळं शिवलाल शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. दोन दिवस झाले तरी तो घरी परतला नव्हता. त्याच्या पत्नीनं आणि भावानं शिवलालचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी सात वाजता त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगताना दिसला. नरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढूव पंचनामा केला.

  मृतदेह विहिरीत कसा
  शिवलाल रात्री मोटारपंप सुरू करण्यासाठी शेतावर गेला होता. अंधार असल्यानं विहिरीचा त्याला अंदाज आला नसावा. त्यामुळं विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलीस नायक दिनेश वरठी व दिंगबर राठोड तपास करीत आहेत. तरीही त्याला कुणी विहिरीत तर ढकलले नसावे, असा संशयही व्यक्त केला जात आहे.

  आर्थिक मदत करण्याची मागणी
  शेताला पाणी देण्यासाठी 24 तास वीज उपलब्ध नसते. त्यासाठी महावितरणनं वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकानुसार, काही दिवस रात्री, तर काही दिवस दिवसा पाणीपुरवठा करण्यासाठी वीज उपलब्ध राहते. रविवार व सोमवारी रात्री नऊ ते सकाळी पाच अशी पाणीपुरवठ्यासाठी वीज उपलब्ध असल्याची वेळ आहे. त्यामुळं शिवलाल रात्री शेताला पाणी देण्यासाठी मोटार सुरू करायला गेला होता. रात्री कडाक्याच्या थंडीतही शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जावे लागते. तेव्हा कुठे गहू, चणा, संत्रा, मोसंबी, भाजीपाल्यास पाणी देता येते. महावितरणच्या वेळापत्रकामुळं शिवलालला रात्री उशिरा शेतात जावं लागलं. यात त्याचा जीव गेला. त्यामुळं त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.