
ओमायक्रॉन हा विषाणू जगभर पसरत आहे आणि भारतात देखील त्याचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता तिसरी लाट नेमकी कशाची असणार याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे.
मुंबई : कोरोनाच्या संसर्गाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत खूप नुकसान झाले आहे. संसर्ग पसरत असल्याने लॉकडाउन लावावा लागला होता, त्यामुळे आर्थिक नुकसान देखील खूप मोठ्या प्रमाणात झाले होते. आता तिसऱ्या लाटेची चर्चा केली जात आहे. त्यातच ओमायक्रॉन हा विषाणू जगभर पसरत आहे आणि भारतात देखील त्याचे रुग्ण सापडले आहेत.
त्यामुळे आता तिसरी लाट नेमकी कशाची असणार याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे. जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि ओमायक्रॉनबद्दल घेतल्या जात असलेल्या उपाययोजनेबद्दल माहिती दिली.
राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?
ओमायक्रॉनची संसर्ग होण्याची गती जास्त आहे. मात्र त्याला घाबरण्याचं काम नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांना जे अनुभव आले त्यामुळे ओमायक्रॉनची दहशत वाटणं साहजिक आहे. त्यामुळे आपल्याला स्वतची काळजी घेणं गरजेचं असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.
तसेच तिसऱ्या लाटे संदर्भात बोलताना राजेश टोपे म्हणाले, कर्नाटकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे संसर्गाची भीती वाटते. मात्र आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, मास्क काढू नये असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.