इमोशनल इटिंगमुळे वाढतोय लठ्ठपणा

जर तुम्हाला तणावग्रस्त असाल किंवा एकटे असाल तर काही खाण्याऐवजी आपल्या मित्राला आठवा. एखाद्या मित्राला फोन करून तुम्हाला आनंद मिळत असेल तर फोन करा. याने तुमचे खाण्यावरील लक्ष दूर होईल.

    ‘काय करू यार वजनच कमी होत नाहीये…’ हे रडगाणे अनेकांकडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण वजन कमी करण्यासाठी संबंधित व्यक्ती खरेच योग्य ते प्रयत्न करीत आहे का? हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारायला हवा. वजन कमी करण्यात सर्वात मोठी अडचण ठरणारी गोष्टी म्हणजे इमोशनल इटिंग. इमोशनल इटिंग म्हणजे भूक लागलेली नसताना भावनेच्या भरात खाणे.

    भूक लागल्यावर सगळेच खातात आणि ही बाबही सामान्य आहे. पण काही लोक असेही असतात जे पोट भरलेले असतानाही काही पदार्थ पाहिल्यावर त्यावर तुटून पडतात. यालाच इमोशनल इटिंग म्हणतात. अनेकजण तणाव, चिंता आणि लालसा यामुळेही इमोशनल इटिंगचे शिकार होतात. खाणे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेच पण प्रमाणापेक्षा जास्त खाणे हानिकारक ठरू शकते.

    काय आहे कारण?
    इमोशनल इटिंगचा अर्थ आहे भावनात्मक भूक. म्हणजे पोट भरलेले असतानाही चवीच्या लालसेत अधिक खाणे. इमोशनल इटिंगची वेगवेगळी कारणे असू शकतात. खासकरून लोक आनंदी असले की, इमोशनल इटिंग अधिक करतात. लग्न, पार्टी अशावेळी लोक एकत्र येतात आणि खाण्यासाठी काही खास पदार्थही असतात. अशात लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात. काही लोकांना एकटेपणा आणि निराशेमुळेही जास्त खाण्याची सवय लागलेली असते. त्यासोबतच काही लोक दु:खी असताना, त्रासलेले असताना खाण्या-पिण्याकडे वळतात. काही लोक असेही आहेत जे थकवा आल्यावर चहा, कॉफी किंवा काही स्नॅक्स खाण्याची सवय लावून घेतात. पण त्यावेळी त्यांच्या शरीराला अतिरीक्त आहाराची गरज नसते.

    धोकादायक कशी?
    इमोशनल इटिंग यासाठी हानिकारक आहे कारण यात तुम्ही खाण्याचा आनंद घेऊ लागता. याने तुमचं पोट तर भरतेच सोबतच तुम्हाला तृप्तीही मिळते. एक-दोनदा तुम्ही जर काही भावनेमुळे इमोशनल इटिंग केले तर, तुमचा मेंदू तुम्हाला सतत मानसिक संकेत पाठवून खाण्यासाठी तयार करत असतो. इमोशनल इटिंगची खास बाब म्हणजे जास्त खाण्याचा तुम्हाला पश्चातापही होतो आणि वरुन रागही येतो. पण असे असूनही पुढच्यावेळी तुम्ही स्वत:ला खाण्यापासून रोखू शकत नाहीत.

    लठ्ठपणाचे व्हाल शिकार
    इमोशनल इटिंगमुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होऊ शकतात. सामान्यपणे इमोशनल इटिंग करणारे लोक हे लठ्ठपणाचे शिकार होतात. जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीर सर्वच पोषक तत्त्वांचा वापर करू शकत नाही. याने वेगवेगळे गंभीर आजार होऊ शकतात. लठ्ठपणा आला तर यातूनच अनेक आजार होतात. त्यामुळेच इमोशनल इटिंग रोखणे गरजेचे आहे.

    असा करा बचाव…

    सर्वातआधी त्या पदार्थांना ओळखा जे तुम्हाला इमोशनल इटिंगसाठी भाग पाडतात. कारणेही ओळखा. सामान्यपणे अनेक लोक हे नकारात्मक वाटते तेव्हा आणि जास्त आनंदी असताना इमोशनल इटिंग करतात.

    इमोशनल इटिंगपासून बचाव करण्यासाठी एक डायरी बनवा. त्यात तुम्ही कोणत्या वेळी काय खाता याच्या नोंदी ठेवा. त्यानंतर हेही लिहा की, काही खाल्ल्यावर तुम्हाला कसे वाटते. काही दिवसांनी तुम्हाला याचा प्रभाव दिसून येईल.

    जर तुम्हाला तणावग्रस्त असाल किंवा एकटे असाल तर काही खाण्याऐवजी आपल्या मित्राला आठवा. एखाद्या मित्राला फोन करून तुम्हाला आनंद मिळत असेल तर फोन करा. याने तुमचे खाण्यावरील लक्ष दूर होईल.

    जर तुम्ही चिंतेत असाल तर ही नकारात्मक ऊर्जा डान्स करून किंवा गाणे म्हणून दूर करा. तसेच तुम्ही बाहेर फिरायलाही जाऊ शकता.

    व्यायाम आणि शारीरिक हालचालीसाठी वेळ काढा. याने तुम्हाला फायदा होईल. याने तुमचा तणाव कमी होईल. याने तुम्हाला फ्रेश तर वाटेलच सोबतच फिटही वाटेल.