संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

 नागपुरातील अनेक परिसरात पावसाचं पाणी भरल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. डागा ले-आऊट, गांधीनगर आणि कॉर्पोरेट कॉलनीतील अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने अनेक लोकांच नुकसान झालं आहे. 

  गणेशोत्सव सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. उपराजधानी नागपुरात उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण असताना आता मात्र, पावसानं (Nagpur Rain ) या सगळ्या उत्साहावर पाणी फेरलं आहे. नागपुरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आता अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असला तरी शहरात पावसांच रौद्ररुप पाहायला मिळत आहे. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नागनदीला पूर (Nagpur Flood) आला आहे. नाग नदीच्या काठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर पाणी शिरल्यानं अनेक वाहनांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.

  शुक्रवारी मध्यरात्रीपासून पाऊस

  शुक्रवारी मध्यरात्रीपासून नागपूर शहराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं आहे. वाडी परिसरात ढगफुटीजन्य पाऊस कोसळल्यानं नागनदीला पूर आला आहे. नागनदीकाठी घरामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. संजीव हजारी, सेपू अपार्टमेंट, अतकरी, माणके पाटील, रमेश विलोनकर, पांडुरंग आणि हाडकर, नवनाथ बागवाले आणि सत्यसाई सोसायटितील अनेक घरांत पुराचं पाणी शिरलं आहे. अनेक जणांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनं तीन फुट पुराच्या पाण्यात डुबली. तसेच, घरांत पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

  नागपुरातील शाळा बंद

   संततधार पावसामुळे नागपूर शहराच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून परिसरातली अनेक अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. यासाठी जिल्हा आणि महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत आहे. नागपुरातील पूरस्थिती पाहता जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा आणि महानगर क्षेत्र) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे.

  कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं नागरिकांना आवाहन

  नागपुरात काल रात्रीपासून सुरू असलेला पाऊस बघता मनपा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की,  आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा. अंबाझरी तलावाचे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच मनपाला 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर संपर्क साधा.