महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने हेरिटेज सप्ताहाचे आयोजन : पल्लवी पाटील

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत हेरिटेज सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील (Pallavi Patil) यांनी दिली.

    महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत हेरिटेज सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील (Pallavi Patil) यांनी दिली.

    महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदे मार्फत हेरिटेज सप्ताहनिमित्त २१ डिसेंबर रोजी सकाळी नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेक येथे इलेक्ट्रिक बोटीचे तसेच हिलदारी अभियानांतर्गत चिप्स व बिस्केट्सच्या पाकिटांपासून निर्माण केलेले पेव्हरब्लॉक व बेंचचे उदघाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. तर येथील सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे हेरिटेज सप्ताहाचे उदघाटन वारसास्थळ जतन समितीचे अध्यक्ष दिलीप बंड, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मकरंद आबा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सायन्स अँड टेकनॉलॉजि पार्क, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, राजू रणदिवे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. याच ठिकाणी हेरिटेज वास्तू फोटो प्रदर्शनाचे देखील उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

    हेरीटेज सप्ताह निमित्त २२ डिसेंबर रोजी सकाळी येथील गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे वारसा जतन स्थळाचे महत्व व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नागरिकांची जबाबदारी व कर्तव्य या दोन विषयांवर निबंध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच २३ डिसेंबर रोजी सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे हेरिटेज वस्तूंचे प्रदर्शन होणार असून, नागरिकांसह पर्यटकांना विविध प्रकारच्या जुन्या वस्तू देखील पाहता येणार आहेत. यासोबतच २४ डिसेंबर हेरिटेज वॉक देखील ठेवण्यात आले आहे. तर २५ डिसेंबर रोजी या सप्ताह निमित्त येथील प्रसिद्ध मुंबई पॉईंट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

    २६ डिसेंबर रोजी सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे मान्यवर व तज्ज्ञ व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच २७ डिसेंबर रोजी या हेरिटेज सप्ताहाचा समारोप सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे बक्षीस वितरण समारंभाने होणार असून, या सप्ताहनिमित्त जुन्या काळातील हेरिटेज वस्तू तसेच हेरिटेज इमारतींचे फोटो प्रदर्शन पाहावयास मिळणार आहेत. उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी तसेच शहरवासीयांसह हेरिटेज वास्तूचे मालक आदींच्या सहकार्यातून या हेरिटेज सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांसह पर्यटकांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन देखील मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.