होर्डिंगमालकांची पालिकेच्या आदेशाला केराची टोपली ; स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर करण्याचे दिले होते आदेश

तब्बल ६०८ होर्डिंगमालकांनी प्रतिसादच नाही , होर्डिंग तोडण्याची कारवाई सुरु

    पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील परवानाधारक व अनधिकृत होर्डिंगचालक व मालकांना होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याला तब्बल ६०८ होर्डिंगमालकांनी प्रतिसाद दिलेला नाही. ते होर्डिंग तोडण्याची कारवाई आकाशचिन्ह व परवाना विभागाने सुरू केली आहे.

    शहरात परवाना असलेले एकूण १३१८ होर्डिंग आहेत. त्यापैकी एकूण ७९९ होर्डिंगमालकांनी स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर केला आहे. तर, अद्याप ५१९ होर्डिंगचा स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखल सादर करण्यात आलेला नाही. ते होर्डिंग तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात गेलेल्या शहरातील ४३४ अनधिकृत होर्डिंगपैकी २२२ होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला प्राप्त झाला आहे. तर, ११४ होर्डिंग काढून घेण्यात आले आहेत.

    एकूण ८९ होर्डिगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखल अजून मिळालेला नाही. ते होर्डिंग तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. होर्डिंग तोडण्याची कारवाई पुर्ण झाल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. न्यायालयात गेलेल्या ४३४ होर्डिंगमालक व चालकांना गेल्या दोन वर्षांचे परवाना शुल्क भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. आतापर्यंत १०६ होर्डिंगचे १ कोटी ६६ लाख रूपये आकाशचिन्ह व परवाना विभागात जमा करण्यात आले आहेत. एकूण ११४ होर्डिंग काढून घेण्यात आले आहेत. उर्वरित २१४ होर्डिंगसंदर्भातील परवाना शुल्क भरण्यासाठी होडिर्ंगमालक व चालक पुढे येत आहेत. प्रथम शुल्क भरून घेऊन त्यांच्याकडून नव्याने अर्ज घेण्यात येत आहे. नियमात असलेल्या होर्डिंगला परवाना दिला जाणार असून, इतर होर्डिंगवर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.