स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांना राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान

शिवशंकर बझारच्या चेअरमन व पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील (Swayamprabhadevi Mohite-Patil) यांना पुणे येथे होणार्‍या चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान देण्यात आला आहे.

    अकलूज : येथील शिवशंकर बझारच्या चेअरमन व पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील (Swayamprabhadevi Mohite-Patil) यांना पुणे येथे होणार्‍या चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान देण्यात आला आहे. त्याबरोबरच विविध क्षेत्रातील त्यांच्या समाजोपयोगी योगदानाबद्दल त्यांना जिवनगौरव पुरस्कार देऊनही गौरव करण्यात येणार आहे.

    कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 26 डिसेंबरला सकाळी 9 ते सायंकाळी 8 या वेळेत पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार्‍या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक व प्रसिध्द साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे असणार आहेत तर स्वागताध्यक्षपदी यशदाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.बबन जोगदंड, संमेलनाचे कार्याध्यक्ष पदावर कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्‍वस्त अ‍ॅड. डॉ. नंदिनी शहासने असणार आहेत. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

    साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देण्यात येणारा यावर्षीचा जिवनगौरव पुरस्कारही स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांना देण्यात येणार आहे. अध्यात्म, पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक तसेच कला क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनमोल योगदान दिले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच व महिलांना व्यावसायासाठी प्रोत्साहित करून केले व स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून शेकडो महिलांचे संसार स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी फुलवले आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या समाजोपयोगी योगदानाबद्दल त्यांना जिवनगौरव पुरस्कार जाहिर झाला आहे.

    चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात विविध मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी, धर्मादाय सहआयुक्त न्यायमूर्ती सु.मु.बुक्के, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पुण्याचे वनसंरक्षक ह.भ.प. रंगनाथ नाईकडे, विभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले, पुण्याचे आयएफएस सुभाष बडवे, उर्मिला कराड, डॉ.जयश्री तोडकर, डॉ.राहुल कराड, कॉसमॉस बँकेचे आनंद चाळके, कॅप्टन निलेश गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक शाम भुरके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.