२०२४ चा मुख्यमंत्री हे कोण कसे सांगू!; जयंत पाटलांनी फेटाळला आव्हाड यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान गृहनिर्माण, मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा, २०२४ मध्ये उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, हा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेटाळून लावला आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान गृहनिर्माण, मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा, २०२४ मध्ये उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, हा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्री ठाकरे हेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करतच आहेत. २०२४ च्या निवडणुकीपर्यंत ते मुख्यमंत्री आहेतच पण निवडणूकीनंतर कोण नेतृत्व करेल, याची चर्चा अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये झालेली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

    याबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर शरद पवार यांची काही चर्चा झाली का, ते मला पहावे लागेल, अशी पुश्तीही त्यांनी जोडली. पुढच्या निवडणुकीआधीच राष्ट्रवादीने आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार नाही, असे ठरवून शस्त्रे खाली टाकले आहेत का, या थेट प्रश्नावर पाटील म्हणाले की, आम्ही आघाडीत सारेच स्वकीयच आहोत. स्वकियांसमोर शस्त्र घ्यायचेच नसतात. अन्य कोणासमोर म्हणाल तर शस्त्रसज्ज आहोतच.

    नदी जोड प्रकल्पाबद्दल पुन्हा बोलणी

    केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांनी संसदेत दिलेली नदी जोड प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती योग्य आहे. पण आम्हाला तो प्रकल्प करायचाच असून, आम्ही पुन्हा गुजरात सरकारसोबत बोलणी करणार आहोत. अशी माहितीही पाटील यांनी दिली.

    राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात नवराष्ट्रशी बोलतांना ते म्हणाले की, तापी व नर्मदा खोर्यातील पंधरा दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी आपल्या हक्काचे आहे. ते सध्या आपण आडवलेले नाही म्हणून, ते गुजरात मध्ये वाहून जाते. नदीजोड प्रकल्पातून ते आपल्यालाच मिळायला हवे, ही आपली भूमिका आहे. त्या पाण्यावर गुजरातने हक्क सांगितल्याने अडचण आहे.