गहुंजे स्टेडियमपर्यंत पोहचायचे कसे! मैदान तर सज्ज परंतु सामना पाहताना प्रेक्षकांची होणार कोंडी, पाहा सविस्तर रिपोर्ट

  पुणे/पिंपरी : वर्ल्ड कप 2023 साठी पुण्याचे गहुंजे स्टेडियम सज्ज झाले असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली. दरम्यान, या स्टेडियमवर 37400 प्रेक्षकांना बसण्याची क्षमता असून, मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, यावेळी प्रेक्षकांना येण्याजाण्याचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या मैदानावर पोहचण्यासाठी दोन रस्ते येतात परंतु दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. येथे, पोहचण्याकरिता मोठी कसरत करावी लागते. हे सर्व कसे होणार हा मोठा प्रश्न आहे.

  नवीन सुविधांविषयी सर्व माहिती

  रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, स्टेडियमच्या नवीन सुविधांविषयी सर्व माहिती माध्यमांना दिली. परंतु, रस्त्यांच्या डागडुजीविषयी माहिती देताना त्यांनी हा विषय पिंपरी महापालिकेच्या अखत्यारित येत असल्याचे सांगितले.

  तिकीट विक्रीची सर्व जबाबदारी आयसीसीच्या अंडर

  आता या मॅचची तिकीटविक्री आणि तिकीटांची पूर्ण जबाबदारी आयसीसीच्या अंडर येत असल्याने यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा कोणताही सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले.

  वाहतूककोंडी होणार हे अगदी निश्चित

  आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनक़डून तयारीसंदर्भात सांगितले जात असले तरीही वाहतूककोंडी होणार हे अगदी निश्चित आहे. यावर रोहित पवार यांना विचारले असता, हे सर्व पिंपरी महापालिकेच्या अखत्यारित येत असल्याचे त्यांनी सांगितले.