वेताळ बांबर्डेत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे यांनी घेतले दर्शन

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते निलेश राणे यांनी या मंदिरात येऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

  अयोध्येत भव्य दिव्य श्रीराम मंदिरात सोमवारी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील १०५ वर्षे जुन्या श्रीराम मंदिरात प्रभूंची पूजा, राम नामाचा जप, महाप्रसाद, वारकरी भजन, कीर्तन आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी प्रभू श्रीराम यांच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते निलेश राणे यांनी या मंदिरात येऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

  वेताळ बांबर्डेत भव्य रॅली
  वेताळ बांबर्डे गावात असलेले हे राम मंदिर १०५ वर्षे जुने असून सामंत कुटुंबियांच्या स्वमालकीचे आहे. मुख्य म्हणजे या मंदिरात प्रभू श्रीराम यांच्यासोबत सीतामाई आहे. पण श्रीराम यांचे बंधू लक्ष्मण यांची मूर्ती येथे नाही. भगवान लक्ष्मण यांची प्रभू राम यांच्यासोबत मूर्ती नसलेले हे भारतातील पहिले मंदिर होय. वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांनी भव्य रॅली काढून प्रभू श्रीराम यांचा जल्लोष केला. यावेळी प्रभू राम, सीतामाई आणि हनुमान यांचा चित्ररथ काढला. यावेळी “श्रीराम जय राम जय जय राम”, “प्रभू रामचंद्र की जय” अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

  भाजप नेते निलेश राणे यांनी केला राम नाम जप
  भाजप नेते निलेश राणे यांनी सकाळी ११ वाजता प्रभू राम मंदिरात येऊन आशीर्वाद घेतले. यावेळी निलेश राणे यांनी मंदिरात राम नामाचा जप केला.

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली पूजा
  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रभू श्रीरामांच्या मंदिरात येऊन विधीवत पूजा केली. तसेच यावेळी महाआरती करून प्रभूरामाचे आशीर्वादही घेतले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना म्हटले की, आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना केली आहे. ही आपल्या देशासाठी गौरवास्पद बाब आहे. आपणा सर्वांना तसेच देशवासीयांना भगवान श्रीराम यांचे आशीर्वाद लाभो ही त्यांनी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी १९९२ मध्ये अयोध्येत गेलेल्या कार सेवकांचा सत्कार सोहळा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.

  यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, जेष्ठ भाजप पदाधिकारी राजू राऊळ, तालुकाध्यक्ष दादा साईल, आनंद शिरवलकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, दीपलक्ष्मी पडते, प्रसाद गावडे, राकेश कांदे आदींनी प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले. यावेळी या श्रीराम मंदिराचे प्रमुख विठ्ठल सामंत, जनार्दन सामंत, सत्यविजय सामंत, सुनील सामंत, एकनाथ सामंत, विलास सामंत, प्रमोद सामंत, प्रसाद सामंत, अभिजीत सामंत, गुरुप्रकाश सामंत यांच्यासहित प्रताप पाटकर, गिरीश सामंत, प्रसाद पाटकर, रामचंद्र सावंत, सागर पाटकर आदी उपस्थित होते.