सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात बंदूक, टॉर्च घेऊन जाणारे शिकारी कॅमेराबंद

येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनीही शासनाला अनेकदा याबाबत कळवले, पण अजूनही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, अलीकडच्या काही दिवसात घडून आलेल्या या घटनांनी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलाची तीव्र गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वन्यप्राण्यांचे मांस शिजत असल्याची माहिती हेळवाक वन्यजीव विभागाला मिळाली.

    नागपूर (Nagpur ) : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बंदूक व टॉर्च घेऊन जाणारे शिकारी काही दिवसांपूर्वी कॅमेराबंद झाले. तर नुकतेच या क्षेत्रात सांबराची शिकार केल्याचेही उघडकीस आले. त्यामुळे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पावर शिकाऱ्याचे सावट घोंगावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट या व्याघ्रप्रकल्पात वन्यप्राणी आणि जंगलाच्या सुरक्षेसाठी तसेच शिकारी आणि तस्करांना आळा घालता यावा म्हणून विशेष व्याघ्र संरक्षण दल आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मात्र या दलापासून वंचित आहे. तरीही या व्याघ्रप्रकल्पात लहानमोठ्या घटना घडत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून येथे विशेष व्याघ्र संरक्षण दलाची मागणी होत आहे.

    येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनीही शासनाला अनेकदा याबाबत कळवले, पण अजूनही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, अलीकडच्या काही दिवसात घडून आलेल्या या घटनांनी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलाची तीव्र गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वन्यप्राण्यांचे मांस शिजत असल्याची माहिती हेळवाक वन्यजीव विभागाला मिळाली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी सापळा रचून मांस शिजवणाऱ्या पाच आरोपींना ताब्यात घेतले.

    पाळण तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘नाव’ गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या प्राण्याची शिकार केली होती. या गावात सांबराची शिकार सापडली व एका घरात ते मांस शिजवले जात होते. अटकेतील आरोपींमध्ये सीताराम शेंडे, विशाल पवार, अशोक विचारे, महेंद्र जगताप, आनंद विचारे यांचा समावेश आहे. या पाचही आरोपींना पाटण येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासात आरोपींचे सहकार्य देखील मिळत नसल्याचे कळते.