चक्रीवादळाचा धोका; ‘या’ तीन राज्यांना अलर्ट जारी

    नवी दिल्ली : सध्या हिवाळा सुरू असला तरी सर्वदूर सध्या अवकाळी पावसाने झोडपल्याचं दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे हवेत गारठा निर्माण झालाय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं देखील नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय.

    दरम्यान अशातच आता पुर्वकिनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय. बंगालच्या उपसागरात जवाद नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं होतं. आज हे चक्रीवादळ विशाखापट्टनम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

    त्यामुळे आंध्र आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ताशी 50 ते 55 किमी ते 100 किमीपर्यंत वारं वाहिलं, अशी माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आंध्रप्रदेश आणि ओडिसा राज्यांना अलर्ट जारी केला असून तब्बल 24 रेल्वेगाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही जिल्ह्यात शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    दरम्यान,राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या म्हणजेच एनडीआरएफच्या 64 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 266 बचाव पथकं देखील नियुक्त करण्यात आल्या आहेत. तर किनारपट्टी भागातील रहिवाश्यांचे स्थलांतर करण्यात आले आहेत.