‘माझ्यावर विषप्रयोग झाला होता’; पत्नीच्या आरोपानंतर पंकज तडस यांची पत्रकार परिषदेमध्ये ऑडियो क्लीप दाखवत केले धक्कादायक खुलासे

खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी पत्रकार परिषद घेत सर्व गोष्टींच खुलासे केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही ऑडिओ व व्हिडिओ क्लीप देखील प्रसिद्ध केल्या आहेत.

  वर्धा – दोन दिवसांपूर्वी भाजपचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने कुटुंबियांनांवर शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस आपल्या लहान मुलासह उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांसमोर त्यांनी कुटुंबावर मारहाण केल्याचे व बाळाची डीएनए टेस्ट करायला लावल्याचे आरोप केले होते. यानंतर आता खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी पत्रकार परिषद घेत सर्व गोष्टींच खुलासे केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही ऑडिओ व व्हिडिओ क्लीप देखील प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण आले आहे.

  शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे खंडन करण्यासाठी पंकज तडस यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. पंकज तडस यांनी हे प्रकरण 2020 सालातील असल्याचे स्पष्ट केले. काही लोकांनी काटकरसास्थान करून फसविण्याचा प्रयत्न केला. त्याला ते बळी पडले. यासाठी त्यांनी न्यायालयात दाद मागितल्याचं देखील पंकज तडस यांनी सांगितले आहे. निवडणुकीच्या तोंडावर रामदास तडस आणि माझ्या या प्रकरणाशी संबंध जोडून पत्रकार परिषद घेतली. रामदास तडस यांनी मला 2020 मध्ये बेदखल केलं होतं. त्यामुळे आजही मतभेद आहे. यामुळे विरोधकांनी हा कट रचल्याचं तडस यांनी म्हटलं आहे.

  नेमकं काय म्हणाले पंकज तडस?

  पंकज तडस म्हणाले की, पत्नी पूजा शेंद्रेवर आजपर्यंत चार प्रकरण आहेत. पूजा शेंद्रेसह दहा लोकांवर तक्रार आहे. या दहा आरोपींवर न्यायालयाने विविध कलमन्वये गुन्हे दाखल केले आहे. या तक्रारीत पंकज तडस यांच्याशी विवाह करण्याकरिता गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे. ही तक्रार न्यायल्यात प्रलंबित असल्याचं पंकज तडस यांनी सांगितलं आहे. माझ्यावर विषप्रयोग देखील झाला होता असा खळबळजनक दावा देखील पंकज तडस यांनी केला. पूजा शेंद्रे हे सर्व प्रसिद्धी आणि राजकीय फायदा घेण्यासाठी करत आहे. फक्त ब्लॅकमेलिंग आणि प्रॉपर्टीवर कब्जा करण्यासाठी केल्याचं आहे. हे सर्व विरोधी पक्षांनी हातात धरून केल्याचा आरोप पंकज तडस यांनी केला आहे.  तसेच सुषमा अंधारे यांनी एकदा माझी बाजू ऐकून घेतली असती तर पत्रकार परिषद घेतलीच नसती असे देखील पंकज तडस म्हणाले आहेत.

  पत्रकार परिषदेमध्ये दाखवली ऑडिओ क्लिप 

  पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप दाखवली आहे. या क्लिपमध्ये ‘आपल्या नावावर काहीही करून घे’ अशी चर्चा आहे. लग्न केल्याचं खोटं सांगितलं, असं चित्र रंगवायचं आहे. आपली फिल्डिंग प्रॉपर आहे कोणाला इंटरटेन करू नका असाही उल्लेख आहे. लग्नाचे डॉक्युमेंट शो कर. पोलीस प्रशासनाच सहकार्य मिळत नाही, असं दाखवावं. परिवारातील सर्वांची तक्रार करा, असाही उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. ही ऑडिओ क्लिप हरीश इथापे आणि पूजा शेंद्रे यांची असल्याचा दावा पंकज तडस यांनी केला आहे. त्यांनी दाखवलेल्या या ऑडिओ क्लीपमुळे नवीन राजकीय वळण या प्रकरणाला आले आहे. या सर्व आरोपींना घेऊन माझ्या जीवाला आणि परिवाराला धोका आहे. आईवडिलांचं राजकीय वलय बदनाम करण्यासाठी हा घाट घातला असल्याचा आरोप पंकज तडस यांनी केला आहे.