‘त्रिपुरात घटना घडते म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करणार असाल, तर खपवून घेणार नाही’; प्रविण दरेकरांचा इशारा

    अमरावती : त्रिपुरामध्ये काही प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव, नांदेड या भागांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये या बंददरम्यान काही हिंसक घटना घडल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

    या हिंसाचारावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्रिपुरात घटना घडते म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करणार असाल, तर खपवून घेणार नाही, असा इशारा दरेकरांनी दिला आहे.

    प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले? 

    दरेकर म्हणाले की, ‘त्रिपुरात घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात अशा प्रकारचा उद्रेक होता कामा नये. तुम्ही इथली शांतता भंग करणार असाल, तर महाराष्ट्र सरकारने त्यावर तातडीने कारवाई करावी. अशा प्रकारचा जातीय तणाव निर्माण होणार असेल तर ते महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही. मग अशा प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडते म्हणून इथं दादागिरी करणार असेल तर महाराष्ट्रात चालणार नाही. खपवून घेणार नाही. सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा हे प्रकरण हाताबाहेर जाईल.’ असं ते म्हणाले.

    दरम्यान, या प्रकरणी प्रतिक्रिया देत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘त्रिपुरा घटनेबाबत काल निवेदन देण्याच्या दृष्टिकोनातून परवानगी मागितली होती. ते निवेदन देऊन परत जाताना काही लोकांमुळे याला वेगळं वळण लागले. भाजपाचा मोर्चा शांततेने होईल अशी अपेक्षा होती. मात्र वेगळं वळण लागलेलं आहे. पोलीस विभाग आवश्यक पावलं टाकत आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बोलत आहेत. राज्य महत्त्वाचे आहे. सर्वांनीच सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.’