पाकिस्तानमध्ये तणाव वाढला; आता इम्रान खानच्या समर्थकांवर कारवाई, पंजाबमध्ये 1000 जणांना अटक

इम्रान खान यांच्या समर्थकांवरही सरकारने कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इम्रान खानच्या 1000 समर्थकांना अटक करण्यात आली आहे. लाहोर आणि आसपासच्या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेनंतर देशात त्याचे गंभीर पडसाद उमटत आहेत. इम्रान खान यांच्या राजकीय पक्ष पीटीआयचे (PTI) कार्यकर्ते रात्री रस्त्यावर उतरले. त्यानंतर रात्रभरात पाकिस्तानात प्रचंड हिंसाचार झाला. आता सरकारने इम्रान खान यांच्या समर्थकांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इम्रान खानच्या 1000 समर्थकांना अटक करण्यात आली आहे.

    हिंसाचारात 130 अधिकारी जखमी

    इम्रान खानच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात 130 अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान खानच्या अटकेनंतर लाहोर, कराची, इस्लामाबाद आणि पेशावरसह देशातील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने झाली आहेत. पेशावरमध्ये इम्रानच्या समर्थकांनी रेडिओ पाकिस्तानच्या इमारतीला आग लावली, तर रावळपिंडीमध्येही लोक पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात घुसले. इम्रान खानच्या समर्थकांच्या संतापामुळे परिस्थिती बिघडताना दिसली, तेव्हा मोबाईल इंटरनेटच बंद करण्यात आले आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही काढून घेण्यात आले. यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर इत्यादी सेवा ठप्प झाली आहे. 

    अनेक ठिकाणी लष्कर तैनात

    पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्कराला तैनात करावे लागले, यावरूनही परिस्थिती किती बिकट आहे, हे समजू शकते. दरम्यान, बुधवारी इम्रान खानला इस्लामाबादच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने कोर्टात इम्रान खानला १४ दिवसांची कोठडी मागितली आहे. ख्वाजा हरिस, अली गोहर यांच्यासह अनेक ज्येष्ठ वकील इम्रान खानच्या वतीने खटला लढत आहेत. इम्रान खानला मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. त्यांनतर मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले.