मावळ तालुक्यात संततधार पाऊस, थंडीमुळे ३२ शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू

मावळ तालुक्यात बुधवारपासून संततधार पाऊस (Rain) आणि थंडीची हुडहुडी सर्वाधिक वाढल्याने तालुक्यातील पिपंळोली गावांमध्ये ३२ पाळीव शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यात बुधवारपासून संततधार पाऊस (Rain) आणि थंडीची हुडहुडी सर्वाधिक वाढल्याने तालुक्यातील पिपंळोली गावांमध्ये ३२ पाळीव शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू (Goats and Sheep Died) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    बुधवारपासून पावसाची संततधार सुरु असताना अचानक वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात गारठा निर्माण झाला. त्यामुळे पिपंळोली गावातील मेंढपाळ धनगर रमेश करे (वय ३१, ता. मावळ) व भीमा नारायण करे (वय ३५, ता. मावळ) या शेतकऱ्यांच्या ३२ बकऱ्या-शेळ्याचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

    घटनेची माहिती मिळताच मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, मंडलाधिकारी माणिक साबळे, तलाठी उदय कांबळे, आरोग्य अधिकारी सरपंच दीपाली बोंबले, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा गायकवाड, सोपान पिंपळे, समीर बालगुडे, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी महसूल अधिकारी आदी उपस्थित होते.

    पावसाची संततधार आणि थंडीची हुडहुडी यामध्ये मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांचा मृत्यू होत असल्याने तात्काळ नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.