नागपुरात हायफाय महिला चोर पोलिसांच्या जाळ्यात, दोन विषयांत एमए, घरातली आर्थिक स्थितीतीही उत्तम

घरातली आर्थिक स्थिती उत्तम, दोन विषयांत एम ए, तीन विषयांत प्रावीण्य अशी महिला, चोर असेल, असे कुणी तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे वास्तव आहे. अशाच एका हायफाय महिला चोराला नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या आहेत.

  नागपूर : घरातली आर्थिक स्थिती उत्तम, दोन विषयांत एम ए, तीन विषयांत प्रावीण्य अशी महिला, चोर असेल, असे कुणी तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे वास्तव आहे. अशाच एका हायफाय महिला चोराला नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या आहेत.

  महिलांच्या पर्स चोरी होत असल्याच्या तक्रारींनी गेल्या काही दिवसांपासून नागपूर पोलीस हैराण होते. या चोऱ्या नेमकं करतंय तरी कोण, यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला होता, मात्र त्यांना त्यात यश मिळत नव्हते. काही दिवसांपूर्वी याप्रकरणी एका महिला चोराला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले.

  आठ वर्षांपूर्वी सुरु केली चोरी

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपूर्वी या महिलेने चोरी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ही महिला ह़ॉस्टेलमध्ये राहत होती. घरातून मिळत असलेल्या पैशांनी तिचे शौक, हौस पूर्ण होत नसल्याने तिने चोरी करण्याचा मार्ग स्वीकारला. काही महिलांसोबोत तिने चोरी करण्यास सुरुवात केली. मात्र चोरीतून मिळालेल्या पैशांच्या वाट्यावरुन भांडणे झाल्यानंतर, तिने एकटीनेच चोऱ्या करण्यास सुरुवात केली.

  आत्तापर्यंत केल्या २० चोऱ्या

  या महिलेने आत्तापर्यंत २० चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चोरीतून मिळालेल्या पैशांतून ही महिला चोर जोरदार पार्टी करीत असे. चोरी केलेले दागिने एखाद्या ज्वेलर्सकडे दिले तर आपला भांडाफोड होईल, याची भीतीही या महिलेला वाटत असे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी महिलांना हेरुन, त्यांच्या पर्समधून ती पैसे लंपास करीत असे. अशा पर्समधून पैसे चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.