कोणी रडलं तरी सुनेत्रा पवार पाच हजारांच्या मताधिक्याने जिंकतील; महादेव जानकर यांचा विश्वास

बारामतीमध्ये कोणी कितीही रडलं  तरी सुनेत्रा पवार या पाच हजाराने का होईना निवडून येतील असा विश्वास रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

    पुणे : लोकसभा निवडणूकीचे तिसरे टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे देखील मतदान झालेले आहे. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार की शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये कोणी कितीही रडलं  तरी सुनेत्रा पवार या पाच हजाराने का होईना निवडून येतील असा विश्वास रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

    सुनेत्रा पवार या पाच हजाराने निवडून येणार

    महादेव जानकर यांनी पिंपरी- चिंचवड येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला असून सुनेत्रा पवार विजयी होतील असे मत व्यक्त केले. शरद पवार गटाकडून बारामतीमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप केला जातो. रोहित पवार यांनी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला. यानंतर महादेव जानकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जानकर म्हणाले, रोहित पवार यांना पराभव दिसत असल्याने असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. बारामतीमधून कोणी रडलं आणि काहीही म्हटलं तरी सुनेत्रा पवार या पाच हजाराने का होईना निवडून येतील असे मत जानकर यांनी दिले.

    मेलो तरी कमळ चिन्हावर लढायचं नाही

    पुढे ते म्हणाले, 2014 ला बारामती शहराने माझ्यावर प्रेम केलं असतं तर पवारांना हरवलं असतं. त्यावेळी मला वेळ कमी मिळाला. चिन्ह ही लोकांपर्यंत पोहचलं नव्हतं. मला वरिष्ठ नेते म्हणत होते, कमळ चिन्हावर लढा. मला कधीच भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचं नाही. मेलो तरी चालेल पण बाण, हाथ आणि कमळावर लढणार नाही. मी माझा पक्ष काढला त्याच चिन्हावर दिल्लीला जाणार. असा विश्वास देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.