अखेर ब्लॅक पँथर बछडी नैसर्गिक सानिध्यात आईच्या कुशीत, वन विभागाच्या अथक प्रयत्नांना मिळाले यश , सर्वत्र कौतुक

    सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथे आढळलेला ब्लॅक पॅंथर या बछड्याची गाठभेट त्याच्या आईशी जुळवण्यात वन विभागाला यश आले आहे. हा बछडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला आहे. यासाठी वन्यजीव संस्थेचे सहकार्य घेण्यात आले.

    कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथील तुकाराम राऊळ यांच्या बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत ११ नोव्हेंबर रोजी ब्लॅक पॅंथर सापडून आला होता. ही प्रजात कमी असल्यामुळे त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून वनविभागाने दक्षता घेतली होती.हा ब्लॅक पॅंथर एक ते दीड वर्षांचा असून त्यांची ताटातूट आईपासून झाली होती. त्याला पुन्हा आईशी गाठभेट घालून देण्यासाठी गेले दोन दिवस वन विभाग प्रयत्न करत होते.यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत होते. या ब्लॅक पॅंथरच्या बछड्याला पिंजऱ्यामध्ये ठेवून त्याच्या आईच्या शोधात वनविभाग होते.काल रात्री ही मोहीम राबविण्यात आली.

    दरम्यान या बछड्याला आईशी भेट घालण्यासाठी या ठिकाणी कोणतीही यंत्रणा नसल्याने वन्यजीव संस्थेचे सहकार्य वनविभागाने घेतले.या संस्थेने सर्वतोपरी प्रयत्न करून अखेर शनिवारी रात्री उशिरा या ब्लॅक पॅंथरच्या आईशी भेट घालून देण्यात वनविभागाला यश आले.