राज्यात आज 43 हजार 211 कोरोनाबाधितांची नोंद, तर 19 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज एकूण 43 हजार 211 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 33 हजार 356 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.28 % इतका झाला आहे. तर मृतांचा आकडाही 20 च्या खाली आहे.

  मुंबई : मुंबईनंतर राज्यातही गेल्या 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत घसरण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मृतांचा आकड्यातही घट झाली आहे. महाराष्ट्रात आज एकूण 44 हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतांचा आकडाही जवळपास दुप्पटीने कमी झाला आहे.

  राज्यात आज एकूण 43 हजार 211 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 33 हजार 356 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.28 % इतका झाला आहे. तर मृतांचा आकडाही 20 च्या खाली आहे.

  राज्यात कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा 1.98 टक्के इतका आहे. राज्यात काल गुरुवारी (13 जानेवारी) 46 हजार 406 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर 36 जणांचा मृत्यू झाला होता.

  मुंबईत किती रुग्ण आढळले? 

  मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 11 हजार 317 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 22 हजार 73 रुग्ण कोरनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता 89 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा 39 दिवस इतका आहे.

  ओमायक्रॉनचे दिवसभरात एकूण 238 रुग्ण

  एका बाजूला मुंबईसह राज्याच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने काहीसा दिलासा होता. मात्र ओमायक्रॉनने चिंता वाढवली. राज्यात ओमायक्रॉनचे दिवसभरात एकूण 238 रुग्ण आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक 197 रुग्ण हे पुणे महानगरपालिका हद्दीतील आहेत. राज्यातील एकूण ओमायक्रॉन झालेल्या रुग्णांचा आकडा हा 1 हजार 605 वर जाऊन पोहचला आहे. यापैकी अनेक जण बरे होऊन घरी परतले आहेत.