
बारामती : बारामती औद्योगिक वसाहत परिसरातील बारामती विमानतळावर पायलट प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड एव्हीएशन फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी या संस्थेचे देशभरातील कामकाज तत्काळ निलंबित करण्याचे आदेश डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हीएशनचे डायरेक्टर फॉर फ्लाईंग ट्रेनिंग कॅप्टन अनिल गिल यांनी दिले आहेत.
शिकाऊ विमानांचे दोन वेळा अपघात
आठवड्यात बारामती परिसरात शिकाऊ विमानांचे दोन वेळा अपघात व एकूण पाच अपघात झाल्याने, याबाबत गंभीर दखल घेऊन ही रेड बर्ड संस्थेला ई-मेल पाठवून ही
करवाई करण्यात आली आहे.
सहा महिन्यांतील हा पाचवा अपघात
टेक्नम पी २००८ जे या विमानाचा अपघात झाल्याची नोंद घेत डीजीसीएने ही कारवाई केली आहे. याबाबत पाठविलेल्या ई-मेलमध्ये अनिल गिल यांनी नमूद केले आहे की, रेडबर्ड या अँकेडमीचा गेल्या सहा महिन्यातील हा पाचवा अपघात आहे. तांत्रिक दोषासह इतर देखभाल दुरुस्ती यामुळे हे अपघात घडले आहेत.
डीजीसीएकडून देखभाल दुरुस्तीबाबत संपूर्ण तपासणी
डीजीसीए आपल्या संस्थेच्या देखभाल दुरुस्तीबाबत संपूर्ण तपासणी करणार आहे. या शिवाय (डेझिग्नेटेड एक्झामिनर) प्रशिक्षकांची क्षमता व त्यांचे अधिकार तपासले जाणार आहे. या सर्व बाबी पूर्ण होईपर्यंत सर्व ठिकाणचे कामकाज तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे डीजीसीएकडून या ईमेलमध्ये म्हटले आहे.
डीजीसीएकडून याची गांभीर्याने दखल
बारामतीत गेल्या चार दिवसांत रेड बर्ड या विमान प्रशिक्षण कंपनीच्या दोन विमानांचे अपघात झाल्यानंतर डीजीसीएकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली. या अपघातात तीन जण जखमी झाले होते, सुदैवाने जीवीतहानी टळली. याबाबत रेडबर्ड च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेण्याचे टाळले.