नव्या वर्षात लोकल फेऱ्यांत वाढ; २४ ते ३६ तासांचे मेगाब्लॉक

मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा पाचवा, सहाव्या मार्गाला गती दिली जात आहे. ही मार्गिका मार्च २०२२ पर्यंत पूर्ण केली जाणार असून त्यासाठी जानेवारी ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत २४ ते ७२ तासांचे ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

    मुंबई : मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा पाचवा, सहाव्या मार्गाला गती दिली जात आहे. ही मार्गिका मार्च २०२२ पर्यंत पूर्ण केली जाणार असून त्यासाठी जानेवारी ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत २४ ते ७२ तासांचे ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण,खोपोली, कसारा मार्गावर जास्तीत जास्त ८० लोकल फेऱ्यांची भर पडेल, असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले. या फेऱ्या वातानुकूलित असतील.

    ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गासाठी गेल्या रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता २ जानेवारी २०२२ रोजी २४ तासांचा ब्लॉक, त्यानंतर ३६ तासांच्या ब्लॉकचे नियोजन करण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पुढील वर्षात मार्चपर्यंत पाचवा, सहावा मार्ग पूर्ण होणार असल्याने त्यानंतर या मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.

    सध्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर, सीएसएमटी ते पनवेल हार्बर आणि ठाणे ते दिवा ट्रान्स हार्बरवर वातानुकूलित लोकल धावत आहे. यातील हार्बर व ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित सेवेला कमी प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या आढावा घेतला जात आहे. कमी प्रतिसाद मिळाल्यास या दोन्ही मार्गावरील एसी लोकल सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर चालवण्याचा विचार  आहे.