परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय वरचेवर खोलात जाताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा सुरू आहे. परमबीर सिंह यांच्या अडचणी इथेच संपल्या नाहीत, परमबीर सिंह यांचं निलंबन अटळ असल्याची चिन्हं आता दिसत आहेत.

    राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर सही केली असल्याची माहिती समोर येत आहे.

    त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

    दरम्यान आयएएस अधिकारी देबाशीष चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील समितीने तपासानंतर काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

    गोरेगाव येथील वसुली प्रकरणात परमबीर सिंह यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले होते. अनेकदा समन्स बजावले तरीही परमबीर सिंह चौकशीसाठी हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आलं. मुंबईत दाखल होताच सिंह यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा सुरू असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याचीही शक्यता आहे.