इंदिरा गांधी महिला साखर कारखाना व अथणी शुगर्सतर्फे कारखाना ताब्यावरून संघर्ष सुरू

इंदिरा गांधी महिला साखर कारखाना व अथणी शुगर्सतर्फे कारखाना ताब्यावरून संघर्ष सुरू आहे. न्यायालयाने इंदीरा गांधी महिला सहकारी साखर कारखान्याच्या बाजूने निकाल दिला आहे.

    गारगोटी : इंदिरा गांधी महिला साखर कारखाना व अथणी शुगर्सतर्फे कारखाना ताब्यावरून संघर्ष सुरू आहे. न्यायालयाने इंदीरा गांधी महिला सहकारी साखर कारखान्याच्या बाजूने निकाल दिला आहे. यातून येणाऱ्या काळात शेतकरी वर्गाचे नुकसान होऊ नये. यासाठी भुदरगड तहसीलदारांनी लक्ष घालून संबंधितांना सूचना द्याव्यात, असे निवेदन देण्यात आले. भाजप किसान मोर्चाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

    इंदिरा गांधी महिला सहकारी साखर कारखाना गेली ५ वर्षे अथणी शुगर्स युनिटकडे चालवण्यास आहे. कारखाना स्थापनेपासून आजपर्यंतचे रेकाॅर्ड पाहता कारखाना ज्या-ज्या कंपनीने चालवण्यास घेतला तर त्या-त्या कंपनीनी कारखाना सोडून जाताना शेतकऱ्यांची थकीत बिले आजअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची ऊसबिलांसाठी मोठी फसवणूक झाली आहे.

    अथणी शुगर्स युनीट क्र. ४ तांबाळे व इंदिरा गांधी महिला सहकारी साखर कारखाना यांच्यात गेली ५ वर्षे न्यायालयीन लढा सुरु होता. त्याचा निकाल ९ डिसेंबर, २०२१ ला महिला कारखान्याच्या बाजूने लागला. तेव्हापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली आहे. जर शेतकऱ्यांची गेली ५ वर्षांपूर्वी झालेली फसवणूक अथणी शुगर्सतर्फे पुन्हा झाली तर याला जबाबदार कोण? तरी आमची भाजप किसान मोर्च्याच्या वतीने अशी मागणी आहे की, येथून पुढच्या ऊस गाळप करणार त्या ऊसाची बिले काटापेमेंट रोखीने करावी. कारण सध्या अथणी शुगर्स साखर, मोलॅसीस, बगॅस दररोज उचलत आहे. तसेच अथणी शुगर्सने २०१७/१८ चे जाहीर दरातील प्रतिटन २०० रुपये देणे बाकी आहेत. मागील काळात आंदोलन केल्यावरच ऊसबीले दिली आहेत.

    २३ डिसेंबरपर्यंत काटापेमेंट वाट बघितली जाईल. अन्यथा शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ पासून तांबाळे कारखान्याची पूर्णपणे वाहतुक थांबवली जाईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांनी दिला. यावेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, शशिकांत वाघरे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील (तिरवडे), विक्रम केंजळेकर आदी उपस्थित होते.